Agriculture Scheme : काही दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व संमती देण्याचा पर्याय बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. तर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्व संमती देऊन त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार आहेत. अशा शेतकऱ्यांना ९ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे मागील सहा महिन्यांमध्ये सोडतमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठीची असलेली मुदत शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे, ज्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाही, त्यांचे अर्ज आज देखील शेतकरी स्तरावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रलंबित आहेत.
परंतु, आता अशा शेतकऱ्यांसाठी ९ जानेवारीपर्यंत म्हणजेच या आठवड्यातील शुक्रवारपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत असून त्यानंतर असे अर्ज हे पोर्टल द्वारे स्वयंरद्द (Auto Delete) होणार आहेत. तर, जे शेतकरी लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी शुक्रवारपर्यंत पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत अन्यथा आपले अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. कागदपत्रे अपलोड करून नंतर पूर्व संमती मिळालेले अर्ज रद्द होणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.
त्यामुळे अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी आता अर्ज निवडलेल्या शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ उतारा, गाव-शिवाराचा पत्ता, आधार का बँक खाते क्रमांक अशी कागदपत्रे देण्याची आवश्यकता नाही. परंतु यांत्रिकीकरणाची योजना असल्यास दरपत्रक (कोटेशन) तसेच फलोत्पादनाशी संबंधित योजना असल्यासा प्राकलन (इस्टिमेट) देणे अत्यावश्यक आहे. ही कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्वसंमतिपत्र दिले जाणार आहे. मात्र कागदपत्रे न दिल्यास असे अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे सात दिवसानंतर रद्द केले जाणार आहेत.
