जालना : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा मोठा डाव कृषी विभागाने उधळून लावला आहे.(Fertilizer Scam)
जालन्यातील नवीन मोंढा परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकत डीएपी, कडुनिंब वेष्टित युरिया, पोटॅश, जैवखते यांसह विविध प्रकारच्या खतांचा तब्बल १८ लाख ७ हजार १८४ रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त केला.(Fertilizer Scam)
या प्रकरणी दोन मुख्य आरोपींसह इतर अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fertilizer Scam)
गोपनीय माहितीवरून धाड
कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १५ मे रोजी सायंकाळी विभागीय आणि जिल्हा भरारी पथकाने नवीन मोंढा भागातील एपीएमसी मार्केटमधील गाळा क्रमांक एस.टी. २६ येथे छापा टाकला.
यावेळी एका ट्रकमधून (एमएच.२३ एआर २४००) खताच्या गोण्या उतरवल्या जात असल्याचे आढळून आले.
पथकाने चौकशी केली असता संबंधित गाळ्याचा कोणत्याही अधिकृत परवान्यात उल्लेख नसल्याचे समोर आले. मे. जयभारत ॲग्रो ट्रेडर्सचे प्रोप्रायटर आकाश प्रमोदसिंग बायस यांना या साठ्याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही.
१२ प्रकारच्या खतांच्या १७६२ गोण्या जप्त
त्यानंतर पथकाने गोदामाची सखोल तपासणी केली असता, डीएपी, कडुनिंब वेष्टित युरिया, झिंक विरघळणारे जैवखत, पोटॅशसह तब्बल १२ प्रकारच्या खतांच्या १७६२ गोण्या आढळून आल्या.
या खतसाठ्याची एकूण किंमत १८ लाख ७ हजार १८४ रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संशयित खतांमधून १३ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, संपूर्ण गोदाम सील करण्यात आले आहे.
शेतकरी आणि शासनाची फसवणूक
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली. या गोदामातील खतसाठ्याचा तपशील यापूर्वी हसनाबाद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खत प्रकरणातील (गुन्हा क्र. १४४/२०२६) माहितीशी जुळत असल्याचे आढळले.
अनुदानित खतांची चढ्या दराने विक्री, कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि बेकायदेशीर 'रि-पॅकिंग'साठी खतांचा वापर करणे, हा या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य उद्देश असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी रवी किसन राठोड यांच्या फिर्यादीवरून आकाश प्रमोदसिंग बायस (प्रोप्रायटर, जयभारत अॅग्रो ट्रेडर्स, जालना) आणि अनिल बाळाप्रसाद मंत्री (मालक, एफको फर्टिलायझर्स, नांदेड) यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरारी पथकाची मोठी कारवाई
ही कारवाई विभागीय भरारी पथक प्रमुख आशिष काळुशे, श्रीकृष्ण बंडगर तसेच जिल्हा भरारी पथक प्रमुख निलेशकुमार भदाणे आणि महादेव काटे यांच्या पथकाने केली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खतांच्या साठेबाजीविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
या कारवाईमुळे जालन्यासह परिसरातील खत वितरण व्यवस्थेत खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या नावावर चालणाऱ्या काळाबाजाराच्या जाळ्यावर प्रशासनाने मोठा घाव घातल्याची चर्चा सुरू आहे.
