BioMix Fertilizer : वाढते रासायनिक खतांचे आणि कीटकनाशकांचे खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि रोग-किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असताना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'बायोमिक्स' हे जैविक मिश्रण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.(BioMix Fertilizer)
विशेषतः हळद, अद्रक आणि मोसंबी पिकांमध्ये रोग नियंत्रण, उत्पादनवाढ आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यात बायोमिक्स प्रभावी ठरत असल्याने राज्यभरातील शेतकरी त्याकडे मोठ्या विश्वासाने पाहू लागले आहेत.(BioMix Fertilizer)
गेल्या पाच वर्षांत तब्बल १ लाख ८० हजार ९७२ शेतकऱ्यांनी बायोमिक्सचा वापर केला असून, २ लाख २१ हजार २५९ हेक्टर क्षेत्रावर त्याचा विस्तार झाला आहे.
विशेष म्हणजे या उत्पादनामुळे कृषी विद्यापीठाला १९ कोटी ९१ लाख ६ हजार रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातून सुरू झालेली ही चळवळ आता शाश्वत शेतीच्या नव्या मॉडेलकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
१४ उपयुक्त सूक्ष्मजीवांची ताकद
बायोमिक्स हे केवळ जैविक औषध नसून १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रभावी मिश्रण आहे. हे मिश्रण जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते, मुळांच्या वाढीस चालना देते, रोगकारक बुरशींवर नियंत्रण ठेवते आणि पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते. परिणामी, शेतकऱ्यांना एकाच उत्पादनातून अनेक फायदे मिळत आहेत.
विशेषतः हळद व अद्रकमधील कुज रोग, मोसंबीतील मुळांचे आजार आणि जमिनीतून पसरणाऱ्या विविध रोगांवर बायोमिक्स प्रभावी ठरत असल्याचा अनुभव शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे रासायनिक बुरशीनाशके आणि कीटकनाशकांवरील खर्चात मोठी बचत होत आहे.
कमी खर्चात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळत असल्याने बायोमिक्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
विद्यार्थ्यांच्या संशोधनातून जन्म
विद्यार्थ्यांच्या संशोधनातून विविध सूक्ष्मजीवांच्या प्रजाती उपलब्ध झाल्यानंतर डॉ. विलास जाधव आणि डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी २००१ ते २००५ या काळात मोसंबीवरील आरोह आणि डिंक्या रोग नियंत्रणासाठी जैविक मिश्रण विकसित केले. त्यालाच पुढे 'बायोमिक्स' असे नाव देण्यात आले.
जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर डॉ. कल्याण आपेट यांनी या मिश्रणात सुधारणा करून ते अधिक प्रभावी बनवले.
'शेतकरीप्रिय उत्पादन' म्हणून ओळख
वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय परभणी तसेच विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांवर बायोमिक्स भुकटी आणि विद्राव्य स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सुरुवातीला मर्यादित क्षेत्रापुरते असलेले हे उत्पादन आता महाराष्ट्रासह राज्याबाहेरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.
२०२५-२६ या वर्षात बायोमिक्सची विक्रमी ६ कोटी ४६ लाख रुपयांची विक्री झाली. एका वर्षात ६९ हजार ७९ शेतकऱ्यांपर्यंत हे उत्पादन पोहोचले असून, ७३ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर त्याचा वापर करण्यात आला आहे.
वाढत्या मागणीमुळे कृषी विद्यापीठाचे हे उत्पादन आता 'शेतकरीप्रिय उत्पादन' म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याचे डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी सांगितले.
हे ही वाचा सविस्तर :Mango Pest Management : आंब्याच्या खोडातून पडतोय भुसा? मग तात्काळ करा 'हे' उपाय
अधिक वाचा :Organic Farming : महागडी खते सोडून शेतकरी आता करतायत 'ही' शेती वाचा सविस्तर
