जळगाव : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा राज्यातील दोन नंबरचा खत कारखाना हा पाचोऱ्यातील युरिया उत्पादन करणारा महत्त्वाचा कारखाना म्हणून एकेकाळी ओळखला जात होता. खत कारखान्यावरूनच राज्यात पाचोरा शहराची ओळख होती. तोच खत कारखाना आज मृत्यूशय्येवर असून, गेल्या ५ वर्षांपासून कारखाना पूर्णपणे बंद पडला आहे.
माजी मंत्री के. एम. बापू पाटील यांनी हा खत कारखाना १९७३मध्ये पाचोऱ्यात आणला. रेल्वे स्थानकाजवळ ३ एकर जागेवर खत कारखान्याची उभारणी केली. ४०० कर्मचारी २४ तास काम करून खत उत्पादन करत असत. येथील खत हे राज्यभर वितरित होत असे. तो कारखाना आज मृतावस्थेत आहे. सन २०२०पासून याठिकाणी केंद्र सरकारतर्फे कच्चा माल पुरविणे बंद झाले.
यामुळे हा कारखाना बंद झाल्याचे येथील पर्यवेक्षकाने सांगितले, या खत कारखान्यात रासायनिक प्रक्रिया करून युरिया, सुपरफॉस्फेट, यापासून दाणेदार १८-१८-१०चे खत तयार करून हजारो टन खत या कारखान्यातून दरवर्षी राज्यभर पाठवले जायचे. यामुळे वाहतूकदार, व्यापारी, कर्मचारी यांना रोजगार मिळाला होता.
मालेगाव व सिल्लोड येथे स्थलांतरित होणार होता..
गेल्या पाच वर्षात हा कारखाना मालेगाव व सिल्लोड येथे स्थलांतरित करण्याच्या मार्गावर होता. मात्र, सध्यातरी या चर्चाच आहेत. अद्यापतरी कारखाना स्थलांतरित झाला नसल्याची माहिती मिळाली. येथील जुन्या मशिनरी काढून नेण्यात आल्या असून काही मशिनरी भंगारअवस्थेत पडून आहेत. नव्या काही मशिनरी आणण्यात आल्या आहेत.
नवीन मशीनरी आणली, तिही धूळ खातच
गोडाऊन व इतर इमारती पडक्या असून नवी मशिनरी गेल्या ४ वर्षांपासून आणलेली असून तीदेखील धूळ खात पडली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कच्चा माल पुरविल्यास हा कारखाना पुनरुज्जीवित होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आमदार किशोर पाटील हे कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसे झाल्यास पाचोऱ्याला गतवैभव प्राप्त होऊन अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
पाचोरा खत कारखाना गेल्या ५ वर्षांपासून बंद असून नवीन बांधकाम झालेले नाही. इमारती पडलेल्या आहेत. नवीन मशिनरी आणलेली आहे. मात्र इमारत बांधकाम अपूर्ण असल्याने जोडणी झालेली नाही. ही जोडणी झाल्यास पुन्हा कारखाना सुरु होऊ शकतो. कारखाना बंद असल्याने खते उत्पादन होत नाही. कारखाना बंद झाल्यामुळे कामगारांचे स्थलांतर झाले. हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा, अशी पाचोरा परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे.
- सुनील इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी तथा प्रभारी व्यवस्थापक, कृषी उद्योग विकास महामंडळ
Mahadbt Lottery List : ऊस तोडणी यंत्राची लॉटरी यादी आली, अशी पहा संपूर्ण जिल्ह्यांनुसार लिस्ट