रऊफ शेख
फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक येथे २०२२ मधील नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या वितरणात मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. (Farmers Subsidy Issue)
तांत्रिक त्रुटीमुळे ८९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम दुबार जमा झाल्याचे समोर आले आहे. (Farmers Subsidy Issue)
या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना ४८ तासांच्या आत अतिरिक्त रक्कम शासनाच्या खात्यात परत जमा करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.(Farmers Subsidy Issue)
या प्रकरणाचा उलगडा नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या तपासणी पथकाच्या अहवालातून झाला. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ५४ लाख २ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले होते. (Farmers Subsidy Issue)
मात्र, तांत्रिक चुकीमुळे ही रक्कम दोन वेळा खात्यात वर्ग झाली. हा प्रकार लक्षात येताच महसूल प्रशासनाने तातडीने वसुलीची प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम दुबार जमा झाली आहे, त्यांनी बँक खात्याचा तपशील तहसील कार्यालयात सादर करून अतिरिक्त रक्कम तातडीने परत करावी.
नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत रक्कम न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांनी 'रक्कम शासनाकडूनच खात्यात जमा झाली असून त्यात आमची कोणतीही चूक नाही,' अशी भूमिका घेतली आहे.
तर काही शेतकऱ्यांनी रक्कम परत करण्याची तयारी दर्शवली असली तरी अल्पावधीत मोठी रक्कम उभी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे प्रशासनातील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महसूल प्रशासनाने मात्र शासनाची रक्कम परत मिळवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
