नंदुरबार : राज्यातील केळी उत्पादक पट्ट्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून केळीला कवडीमोल भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील देऊर येथील शेतकऱ्याने कापनीला आलेल्या केळीला भाव मिळत नसल्याने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला.
आधीच आस्मानी संकटाशी दोन हात करत शेतकऱ्याने कसे-बसे पिकाचे संगोपण केले. परंतु व्यापाऱ्याकडून कवडीमोड भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील देऊर शिवारातील गट नंबर ४६ मध्ये शेतकरी मुकेश भिमराव माळी यांनी ६ एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली. लाखों रूपये खर्च करून कसे बसे पिकाचे संगोपन केले.
शेतकऱ्याला बसला सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसानीचा फटका
परिपक्व झालेली केळी आता कापणीला आली असता, व्यापाऱ्याकडून नाममात्र २०० ते २५० रूपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव देण्यात येत आहे. यामुळे पिकावर झालेला खर्च निघणेही मुश्किल आहे.
निसर्गाच्च्या अवकृपेमुळे आधीच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच कसे-बसे करून वाचवलेल्या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शिक्षण आणि आरोग्याचा खर्च करावा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूच्या धारा
शेतातील पिकांचे लहान मुलाप्रमाणे संगोपन केले. आस्मानी आणि सुलतानी संकटामुळे मेताकुटीला शेतकरी आला आहे. शेतातील पिकांवर डोळ्यादेखत रोटाव्हेटर फिरतांना पाहून शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते.
