फकिर बागवान
अंबड तालुक्यातील रुई गावातील तरुण व प्रगतशील शेतकरी राम आसाराम बिडे यांनी अल्प क्षेत्रात भाजीपाला पिकांची लागवड करून मेहनत, नियोजन आणि आधुनिक कृषी तंत्रांच्या योग्य वापरातून अवघ्या काही महिन्यांत तब्बल तीन लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. (Farmer Success Story)
मेथी आणि कारल्याच्या लागवडीमधून मिळालेले भरघोस उत्पादन ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.(Farmer Success Story)
यशाचे रहस्य काय?
गट क्रमांक ३३२ मधील त्यांच्या शेतात त्यांनी एक एकर मेथी आणि दहा गुंठ्यांत कारल्याची लागवड केली. अल्प गुंतवणुकीतही मोठा नफा मिळू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
बिडे सांगतात की, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळेवर फवारणी केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. कृषी मार्गदर्शक शंकर लहामगे यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले.
१० गुंठ्यातील कारले—दीड लाखाचा नफा!
जून महिन्यात केलेल्या कारल्याच्या लागवडीने राम बिडे यांच्या शेताचा कायापालट केला.
कारल्याचे उत्पन्न : १,८२,०००
एकूण खर्च : ३२,०००
(बियाणे, ड्रिप, दोन बॅगा खत, दोन बॅगा जैविक खत, फवारणी, मजुरी)
एकूण निव्वळ नफा : १,५०,००
कारल्याची विक्री त्यांनी १० किलो पॅकिंगद्वारे अंबड आणि तीर्थपुरी बाजारात केली. उच्च दर्जाच्या उत्पादनाला चांगला दर मिळाल्याने उत्पन्नात मोठी भर पडली.
मेथीतूनही दीड लाखांची कमाई!
१० ऑक्टोबर रोजी काढलेल्या एक एकर मेथीने देखील जबरदस्त उत्पन्न दिले.
एकूण खर्च : ७,५००
(खताची १ बॅग, जैविक खत १ बॅग, दोनदा फवारणी — कुटुंबीयांनी काढणी केल्याने मजुरीचा खर्च शून्य!)
१० ते १२ रुपये प्रति जुडी दराने विक्री
१३ नोव्हेंबरपर्यंत उत्पन्न : १,५०,००० पेक्षा जास्त
सध्या शेतात अजूनही मेथी उपलब्ध असून पुढेही विक्री होणार आहे.
अल्प क्षेत्रातही मोठ्या कमाईचे सूत्र
राम बिडे यांच्या या यशाने सिद्ध केले की, योग्य पिकांची निवड, स्वस्तात काढणी आणि वेळेवर व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे अल्प क्षेत्रातही मोठे उत्पन्न मिळवता येते.
प्रेरणादायी शेतीमॉडेल
रुई गावातील या यशकथेने अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन दिले आहे. कमी खर्च, अधिक उत्पादन आणि चांगला बाजारभाव या त्रिसूत्रीवर आधारित शेती हा एक उत्तम पर्याय असल्याचे या उदाहरणातून स्पष्ट होते.
कष्ट आणि योग्य नियोजन असेल तर शेतीतून मोठी कमाई शक्य आहे. भाजीपाला शेती हा शेतकऱ्यांसाठी नफ्याचा उत्तम पर्याय आहे. - राम बिडे, शेतकरी
