Farmer Success Story : जिथं पावसाच्या थेंबावर शेती उभी असते, तिथं वाट बदलली... आणि आज उत्पन्नाच्या लाटांवर भरारी घेतली. साळेगाव (घारे) येथील शेतकरी विठ्ठल डिखुळे यांनी कोरडवाहू जमिनीवर शेततळं, ड्रॅगन फ्रूट(Dragon Fruit) आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून यशाचं झाड फुलवलं. (Dragon Fruit)
शेततळ्याने वाट बदलली, ड्रॅगन शेतीने नशिब!
जालना जिल्ह्यातील साळेगाव घारे येथील विठ्ठल डिखुळे या दूरदृष्टी आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने कोरडवाहू शेतीतील संकटावर मात करत समृद्धीची दिशा पकडली आहे.
अवघ्या ४ एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी केवळ आधुनिक शेतीचा आणि कृषी योजनांचा योग्य वापर करत लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. हे यश त्यांनी केवळ कल्पनाशक्तीच्या जोरावर नाही, तर नियोजन, अभ्यास आणि प्रामाणिक कष्टांनी मिळवलं आहे.
शेततळ्याने दिला नवा श्वास
डिखुळे यांच्याकडे फक्त कोरडवाहू जमीन होती. दरवर्षी पावसावर अवलंबून असलेली शेती त्यांना फारसं उत्पादन देत नव्हती. मात्र, २०१९ मध्ये 'मागेल त्याला शेततळे' या शासन योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या शेतात पाणी साठवणुकीसाठी शेततळे खोदले. या टप्प्यानंतर त्यांच्या शेतीचा प्रवासच बदलून गेला.
ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड
२०२० मध्ये शेततळ्याच्या पाण्यावर आधारित त्यांनी १ एकर क्षेत्रावर ५०० ड्रॅगन फ्रूट झाडांची लागवड केली. कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत योग्य मानले जाणारे हे पीक त्यांनी अभ्यासपूर्वक निवडले.
नैसर्गिक खतांचा वापर, तांत्रिक मार्गदर्शन आणि मेहनत यांच्या जोरावर झाडांनी भरघोस फळधारणा केली.
दुग्ध व्यवसायातून दुहेरी उत्पन्न
ड्रॅगन फ्रूट लागवडीसोबतच उर्वरित क्षेत्रात त्यांनी चारा पिके घेतली आणि दुधाळ जनावरे खरेदी करून दुग्ध व्यवसाय सुरू केला. या शेणखताचा उपयोग त्यांनी ड्रॅगन पिकासाठी केला आणि रासायनिक खतांचा खर्च वाचवत उत्पादनात वाढ केली.
४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न!
ड्रॅगन फ्रूटच्या १ एकर लागवडीत वार्षिक सुमारे ५० हजार खर्च झाला, पण उत्पन्न ५ लाख रुपये मिळाले. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट झाली असून, शेतकरी म्हणून समाजातही त्यांचा सन्मान वाढला आहे.
प्रशासनाकडून मार्गदर्शन आणि पाठबळ
डिखुळे यांना तंत्र अधिकारी डॉ. संदीप जगताप यांनी ड्रॅगन फ्रूट पिकावरील 'ग्रे ब्लाइट' रोगाची लक्षणे व त्यावरील उपाय योजनेविषयी मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी विष्णू राठोड यांनी पिकामध्ये रासायनिक खताचा संतुलित वापर करून हिरवळीचे खत व शेणखताचा वापर या बद्दल माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी भरत नागरे यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत पॅक हाऊस या घटकासाठी ऑनलाइन अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यास आव्हान केले.
कोरडवाहू शेती म्हणजे संकट नव्हे; ती एक संधी आहे. फक्त बदल स्वीकारावा लागतो.
विठ्ठल डिखुळे यांनी या उक्तीचा अर्थ आपल्या कार्यातून जिवंत केला आहे. त्यांनी दाखवलेली वाट आजच्या नव्या पिढीच्या शेतकऱ्यांसाठी एक दिशा ठरू शकते.