नाशिक : केंद्र सरकारतर्फे ॲग्रिस्टॅक नोंदणी (Agristack Registration) अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक क्रमांक देण्यात येत आहे. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल माध्यमातून विविध योजना पोहोचविण्यात येणार आहेत. राज्यात ४६ लाख ८६९ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ॲग्रिस्टॅकवर नोंदणी (Farmer Id Registration) केली आहे. या नोंदणीमध्ये नाशिक ३ लाख ८ हजार ४११ इतकी नोंद करून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अहिल्यानगर ३ लाख ६० हजार इतकी नोंदणी करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. जळगाव (३ लाख ३ हजार) पाचव्या क्रमांकावर आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रिस्टॅक (Agri Stack) उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना डिजिटल पद्धतीने देण्यात येणार आहे. तसेच एका क्लिकवर संबंधित शेतकऱ्यांना यंदा कोणते पीक घेतले याची माहिती मिळेल. याशिवाय जिओ रेफरन्सिंगद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला शेतीचे डिजिटल नकाशे उपलब्ध होतील. गेल्यावर्षी १६ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला प्रारंभ करण्यात आला.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने एकाचवेळी ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत ५१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक उपक्रमात नोंदणी केली आहे. राज्यात अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणीत अहिल्यानगर अव्वल स्थानी, तर नाशिक द्वितीय, कोल्हापूर, सातारा, जळगाव अनुक्रमे तृतीय, चतुर्थ आणि पाचव्या स्थानी आहे.
नाशिक जिल्ह्यातील नोंदणी
नाशिक तालुक्यात 14,338 शेतकऱ्यांची नोंदणी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात 8697 शेतकऱ्यांची नोंदणी, इगतपुरी तालुक्यात 18 हजार 172 शेतकरी नोंदणी, चांदवड तालुक्यात 20 हजार 667 शेतकरी नोंदणी, सिन्नर तालुक्यात 29 हजार 996 शेतकरी नोंदणी, कळवण तालुक्यात 12 हजार 241 शेतकरी नोंदणी, दिंडोरी तालुक्यात 21 हजार 822 शेतकरी नोंदणी, देवळा तालुक्यात 12 हजार 675 शेतकरी नोंदणी, बागलाण तालुक्यात 27 हजार 382 शेतकरी नोंदणी, निफाड तालुक्यात 35 हजार 301 शेतकरी नोंदणी, मालेगाव तालुक्यात सर्वाधिक 36 हजार 596 शेतकरी नोंदणी, सुरगाणा तालुक्यात 12 हजार 963 शेतकरी नोंदणी, येवला तालुक्यात 28 हजार 189 शेतकरी नोंदणी तर सर्वात कमी पेठ तालुक्यात 7818 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.