- युवराज गोमासे
Falbag Lagvad : केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत रोह्यो योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर फळ रोपांची सलग व बांधावर लागवड केली आहे. जर तुम्हालाही मनरेगा अंतर्गत तुमच्या शेतात फळबाग लागवड करायची असल्यास ही योजना फायदेशीर आहे.
असे आहेत पात्रतेचे निकष
लाभार्थ्यांच्या नावे जमीन असावी. जॉबकार्डधारक व अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी असावा. जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व सातबारा उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल, तर योजना कुळाच्या संमतीने राबविता येते. लाभार्थ्यांना ०.०५ ते २.०० हेक्टर क्षेत्राचे मर्यादित फळबाग लागवड करता येते.
तीन वर्षांत असे मिळत असते अनुदान
केंद्र शासन पुरस्कृत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत १०० टक्के अनुदान दिले जाते. हे अनुदान तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने दिले जाते. प्रथम वर्षात रोप खरेदी, वाहतूक, लागवड, मजूरी, खत व पाण्याचे नियोजन करण्यासाठी ५० टक्के अनुदान, द्वितीय वर्षात झाडे २० टक्के जीवंत राहिल्यास ३० टक्के, तर तृतीय वर्षी २० टक्के अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जाते, अशी माहिती कृषी अधिकारी अरुण रामटेके यांनी दिली.
भंडारा जिल्ह्यात ३०७ हेक्टरवर लागवड
एकट्या भंडारा जिल्ह्यात २४९ शेतकऱ्यांनी ३०७ हेक्टरवर आंबा, पेरू, केळी, सीताफळ व फणस आदी स्थानिक बाजारपेठेत मागणी असलेल्या यात २४ हजार ६७७ फळ रोपांचा समावेश आहे. मार्च ते जून या कालावधीत सलग शेतात ९ हेक्टर, तर २९८ हेक्टर बांधावर विविध फळ रोपांची लागवड झाली आहे. फळबागेतील रोपे लहान असताना ३ ते ५ वर्षांपर्यंत सलग शेतातील मोकळ्या जागेत भाजीपालावर्गीय पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
यंदा फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. शेती पूरक व्यवसायात वाढ करणे, उत्पादन वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. फळबागसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभघ्यावा.
- संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.
