नाशिक : नाशिक विभागात 2025-26 या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (MNREGA) योजनेंतर्गत 8 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
रोहयो अंतर्गत (Rojgar Hami Yojana) शेतकऱ्यांना त्यांच्या उपलब्ध शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देणे या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाकडून 100 टक्के अनुदान अदा करण्यात येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून फळबाग लागवड करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड (Fruit Farming) कार्यक्रमासाठी जॉबकार्ड धारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, या प्रवर्गातील शेतकरी, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असेलेले लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी लाभ घेण्यास पात्र आहेत.
तसेच कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्प भूधारक व सीमांत शेतकरी, अनु. जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती यापैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणारा लाभार्थी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ घेवून शकतो. याबाबत अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागीय कृषी सहसंचालक काटकर यांनी केले आहे.