Fake Seeds : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरलेली बियाणं बनावट निघाल्याने वाशिम जिल्ह्यातील अनेकांना दुबार पेरणीचा फटका बसला आहे. (Fake Seeds)
उगमशक्ती कमी असल्यामुळे आर्थिक नुकसान होत असून कृषी विभागाने दोषी सेवा केंद्रांवर छापे टाकून कारवाईला सुरुवात केली आहे.(Fake Seeds)
बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढले, पण उत्पादन मिळत नसून, आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाकडे दाखल तक्रारींची दखल घेत काही सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.(Fake Seeds)
बोगस बियाण्यांवर कारवाई
जिल्ह्यात कृषी विभागाकडे यंदा बनावट बियाण्यांविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही कृषी सेवा केंद्रांवर छापे टाकून बोगस बियाण्यांची साठवणूक व विक्री उघडकीस आली असून, संबंधित विक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी सांगितले की, बनावट बियाण्यांवर प्रयोगशाळा चाचणी करून दोषी आढळल्यास परवाने निलंबित, रद्द आणि गुन्हे दाखल केले जात आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचं बियाणं मिळावं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
उगमशक्ती कमी, उत्पादन धोक्यात
जिल्ह्यात यंदा काही बियाण्यांची उगमशक्ती केवळ ३० टक्क्यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यावर अतिरिक्त खर्च येत असून, पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणीसाठीचा वेळही कमी झाला आहे. त्यामुळे हंगामात अपेक्षित उत्पादन न मिळण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय पेरणी स्थिती (११ जुलैपर्यंत)
तालुका | पेरणी टक्केवारी |
---|---|
रिसोड | ९०% |
मंगरुळपीर | ८६% |
मालेगाव | ९६% |
वाशिम | ८९% |
कारंजा | ८६% |
मानोरा | ८१% |
जिल्हा सरासरी | ९०% |
तक्रार कशी कराल? नुकसानभरपाई मिळते का?
शेतकऱ्यांनी वापरलेल्या बियाण्याच्या पिशवीवरील तपशीलासह जवळच्या कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी. प्रयोगशाळा अहवालात दोष सिद्ध झाल्यास नुकसानभरपाई मिळवता येते. मात्र, यासाठी बियाण्याची पिशवी, बिल व अन्य रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
कायद्यांतर्गत कारवाईची तरतूद
बीज नियंत्रण अधिनियम १९६६ नुसार बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यातही दोषी विक्रेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याची आणि परवाने निलंबित/रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बियाणं खरेदी करताना अधिकृत सेवा केंद्रावरच खरेदी करावी. पिशवीवरील तपशील तपासावा आणि पुरावे सुरक्षित ठेवावेत. कुठल्याही शंका असल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.