Fake Maize Seeds : मक्याचं बियाणं फसवं ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पेरणी व उगवण व्यवस्थित झाली तरी काढणीच्या वेळी कणसात दाणेच न भरल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित बियाणे कंपनीविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.(Fake Maize Seeds)
खामगाव तालुक्यातील पोरज गावात मक्याच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. खरीप हंगामात पेरलेल्या मक्याच्या पिकाला कणसे लागूनही त्यामध्ये दाणे न भरल्याने सुमारे ५० एकर क्षेत्रावरील संपूर्ण पीक वाया गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.(Fake Maize Seeds)
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचा दावा करण्यात येत असून, याप्रकरणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.(Fake Maize Seeds)
पोरज येथील काही शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने एका खासगी कंपनीचे महागडे मक्याचे बियाणे खरेदी करून पेरणी केली होती.(Fake Maize Seeds)
सुरुवातीला पीक चांगल्या स्थितीत वाढले; मात्र कणसे तयार झाल्यानंतर त्यामध्ये दाणेच न भरल्याचे निदर्शनास आले. परिणामी, पीक काढणीच्या टप्प्यावर येऊनही उत्पादन शून्य राहिले असून, शेतकऱ्यांच्या हाती काहीच न लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.(Fake Maize Seeds)
कंपनीकडून पंचनामा; मात्र भरपाई नाही
या प्रकाराची माहिती संबंधित बियाणे कंपनीला देण्यात आल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. यावेळी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र अद्याप कोणतीही आर्थिक भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा संताप शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सखोल चौकशी करून कारवाईची मागणी
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाढती लागवड खर्च, महागडी बियाणे, खत व औषधांवरील खर्च लक्षात घेता या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
बोगस बियाण्यांचे प्रकार वाढतेच
मागील दोन-तीन वर्षांपासून बोगस व निकृष्ट बियाण्यांबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. उगवण क्षमता कमी असलेली किंवा उत्पादन न देणारी बियाणे विक्रीस येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
कृषी विभागाकडे अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने दाखल होत असूनही, ठोस कारवाई होत नसल्याबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
या शेतकऱ्यांनी दाखल केली तक्रार
या गंभीर प्रकरणाबाबत पोरज येथील संदीप राजाराम हेरोडे, देवेंद्र श्यामराव इंगळे, विजय रामेश्वर बोराडे, प्रदीप राजाराम हेरोडे, नीलेश श्यामराव वाकोडे, उमेश श्यामराव वाकोडे, कडूबा बळीराम शेगोकार, श्यामराव मनू सकळकळे, अभय भगवानसिंग बोराडे, चतरसिंग मोहनसिंग बोराडे, शरद तेजराजसिंग बोराडे आणि संजय रामभाऊ सकळकळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जाईल. त्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. - सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी, खामगाव
बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, अशा कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. नुकसानभरपाई मिळेपर्यंत शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maize Cultivation : मका लागवड भोवली; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर
