जळगाव : यावर्षी झालेल्या अतिथंडीमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत लागवड केलेल्या केळी बागांना मोठा फटका बसला असून, अनेक शेतकऱ्यांवर केळी बागा उपटून टाकण्याची वेळ आली आहे. गुढे परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. मात्र, यंदा तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्याने केळीच्या झाडांची वाढ खुंटली असून, पाने व शेंडे करपण्याचे प्रमाण वाढले आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत केळीची रोपे तसेच काही ठिकाणी खोडांची लागवड केली होती. सामान्यतः केळी पिकासाठी २५ अंशांपेक्षा जास्त तापमान आवश्यक असते. मात्र, यावर्षी झालेल्या तीव्र थंडीमुळे केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. एकरी सुमारे १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करूनही केळीची झाडे सुकत असून वाढ पूर्णतः थांबली आहे.
फवारण्याही 'फेल'
शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर, तसेच महागड्या फवारण्या करून पाहिल्या. मात्र अपेक्षित परिणाम न मिळाल्याने गुढे व परिसरातील अनेक शेतकरी आपली केळी बाग काढून टाकण्याच्या तयारीत आहेत.
उत्पादन खर्च वाढला
केळी पिकाला लागवडीपासूनच मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मात्र, सध्या बाजारात केळीला ७०० ते १ हजार रुपये इतकाच भाव मिळत आहे. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
केळी हे अत्यंत खर्चिक पीक आहे. त्यातच बाजारभाव खर्चाच्या तुलनेत खूपच कमी मिळत आहेत. अतिथंडीमुळे नव्याने लागवड केलेल्या केळीची वाढ होत नसून बाग उपटून टाकण्याची वेळ आली आहे.
- कैलास वनामाळी, केळी उत्पादक शेतकरी, गुढे, ता. भडगाव
