मुंबई : भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आपले नाव व जन्मतारीख यांसारख्या वैयक्तिक माहितीत (EPFO Online Update) आता स्वतःच ऑनलाइन बदल करू शकतील. त्यासाठी त्यांना रोजगारदाता कंपनीकडून पडताळणीची; अथवा ईपीएफओच्या मंजुरीची गरज राहणार नाही. शनिवारी ही सुविधा कार्यरतही झाली आहे. ईपीएफओच्या ७.६ कोटी सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
याशिवाय ई-केवायसी (आधारशी जोडलेले) असलेले खातेधारक रोजगारदात्यांच्या हस्तक्षेपाशिवाय विनाआधार ओटीपीसह ईपीएफ (EPF) हस्तांतरण दावे ऑनलाइन दाखल करू शकतील. केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी शनिवारी दोन्ही सुविधांचा शुभारंभ केला.
मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओ सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींपैकी २७ टक्के तक्रारी या प्रोफाइल/केवायसीशी संबंधित आहेत. ही सुविधा सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी होतील. व्यक्तिगत माहितीतील सुधारणेसाठी आणण्यात आलेल्या नव्या सुविधेचा लाभ मोठा कर्मचारी वर्ग असलेल्या बड्या कंपन्यांनाही होईल.
कोणाला घेता येईल सुविधेचा लाभ?
१ ऑक्टोबर २०१७ नंतर ज्यांचा यूएएन (सार्वभौम खाते क्रमांक) जारी झाला आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. १ ऑक्टोबर २०१७ पासून यूएएन क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक करण्यात आले होते. १ ऑक्टोबर २०१७ च्या आधीचा यूएएन असल्यास रोजगारदाता कंपनी ईपीएफओच्या मंजुरीशिवाय तपशिलात बदल करू शकते. अशा प्रकरणांत सहायक दस्तावेजांच्या आवश्यकतेची अट सुलभ करण्यात आली आहे. आधारशी जोडणी नसलेल्या यूएएन प्रकरणात मात्र सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यास रोजगारदात्या कंपनीसमक्ष हजर व्हावे लागेल.
घरबसल्या पीएफ माहिती अपडेट करण्यासाठी, EPFO सदस्य पोर्टलवर लॉग इन करावा लागतो. यासाठी, तुमचा UAN आणि पासवर्ड वापरावा लागतो. पीएफ माहिती अपडेट करण्यासाठी, खालील पायऱ्यांचे पालन करा :
- EPFO सदस्य पोर्टलवर लॉग इन करा.
- 'व्यवस्थापित करा' पर्यायावर जा.
- 'मूलभूत तपशील सुधारित करा' वर क्लिक करा.
- तुमच्या आधार कार्डानुसार योग्य माहिती प्रविष्ट करा.
- पुढील सबमिट बटनावर क्लिक करा.
पीएफ माहिती अपडेट करण्यासाठी, तुम्ही खालील तपशील अपडेट करू शकता:
नाव, लिंग, जन्मतारीख, पालकांचे नाव, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, आधार, मोबाईल क्रमांक.