यवतमाळ : कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना महिलांचा सहभागही अधिक बळकट होत आहे. याच पार्श्वभूमीवर महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यावतीने महिलांना ड्रोन फवारणीचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून या योजनेची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाली आहे. (Drone Sakhi)
जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांना ड्रोन फवारणीचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले असून या महिला आता गाव पातळीवर थेट शेतशिवारात ड्रोनद्वारे फवारणी करणार आहेत.(Drone Sakhi)
भविष्यात कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाचा विस्तार अधिक प्रमाणात होणार असून त्याचा लाभ महिलांनाही मिळावा, या उद्देशाने माविमने ही नाविन्यपूर्ण योजना राबवली आहे. (Drone Sakhi)
योजनेअंतर्गत बचतगटांच्या महिलांना ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून त्याच्या सुरक्षित व प्रभावी वापरासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. (Drone Sakhi)
ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांच्या माध्यमातून पुणे येथे देण्यात आले. प्रशिक्षणानंतर या महिलांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शेतशिवारात ड्रोन फवारणीचा यशस्वी प्रात्यक्षिक प्रयोग केला. या ठिकाणी ड्रोन फवारणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून महिलांना शेतात काम करण्याचा आत्मविश्वास देण्यात आला.
या 'ड्रोन सखी' गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या शेतात फवारणीचे काम करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना मजूर मिळण्याची अडचण, जास्त वेळ आणि औषधांचा अपव्यय होत होता. ड्रोनच्या वापरामुळे कमी वेळात अधिक क्षेत्रावर अचूक फवारणी शक्य होणार असून औषधांचीही बचत होणार आहे. शिवाय, फवारणीदरम्यान होणाऱ्या विषबाधेचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
१६ हजार एकरवर ड्रोन फवारणीचे उद्दिष्ट
जिल्ह्यातील १६ तालुक्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रत्येक तालुक्यासाठी एक हजार एकर शेतशिवारावर ड्रोन फवारणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यानुसार संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १६ हजार एकर क्षेत्रावर ड्रोन सखींमार्फत फवारणी केली जाणार आहे. कमी दरात उपलब्ध होणारी ही सेवा शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला हातभार लावणारी ठरणार आहे.
ड्रोन टेक ऑफ करताना विशेष काळजी
* ड्रोन फवारणी करताना सुरक्षितता आणि अचूकतेसाठी ठराविक नियमांचे पालन आवश्यक आहे.
* ड्रोन टेक ऑफ करताना २० ते ३० फूट अंतरावरून प्रक्रिया पूर्ण केली जाते, ज्यामुळे प्रत्येक झाडावर समान प्रमाणात औषधांची फवारणी शक्य होते. यासाठी माविम, कृषी विज्ञान केंद्र आणि ईनव्हायरल सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रोन सखींना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
फोन करताच शेतात पोहोचणार 'ड्रोन सखी'
तालुकास्तरावर ड्रोन सखींना फोन केल्यानंतर त्या शेतकऱ्याचे लोकेशन घेऊन थेट शेतशिवारात दाखल होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा मजूर शोधण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार असून काही तासांतच संपूर्ण फवारणी पूर्ण करता येणार आहे. यामुळे किडींचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ दीपक कचवे, संतोष फलटकनकर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांच्यासह मोठ्या संख्येने ड्रोन सखी उपस्थित होत्या. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा हा उपक्रम कृषी क्षेत्रासाठी नवा मार्ग दाखवणारा ठरत आहे.
