गोंदिया : घरातील स्विच बोर्डपासून ते शेतातील वीजखांबांपर्यंत वीज वापरातील निष्काळजी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रतीक्षा करूनही वायरमन वेळेवर येत नसल्याने शेतकरी थेट वीज खांबावर चढून फ्युज बदलताना दिसत आहेत.
हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, अपघातांना आमंत्रण देणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी ११ ते १७ जानेवारीच्या दरम्यान 'विद्युत सुरक्षा सप्ताह' साजरा केला जातो. सद्यस्थितीत विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे.
तांत्रिक ज्ञान नसताना केलेले काम धोक्याचे!
शेतात पिकांना पाणी देण्यासाठी वीज ही जीवनवाहिनी ठरते. मात्र, वीजपुरवठा खंडित झाला की, अनेक शेतकरी वेळेवर अधिकृत कर्मचाऱ्यांची मदत मिळणार नाही, या भीतिपोटी स्वतःच वीज खांबावर चढून फ्युज बदलण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारतात. पावसाळ्यात ओलसर जमीन, चिखल, घामामुळे भिजलेले कपडे, रबर हातमोजे किंवा सेफ्टी बेल्टसारख्या संरक्षण साहित्याचा अभाव आणि विद्युत यंत्रणेचे पुरेसे तांत्रिक ज्ञान नसताना केलेले हे काम थेट जीवाशी खेळणारे ठरते.
विद्युत सुरक्षेसाठी खबरदारीचे महत्त्वाचे उपाय !
वीज सुरक्षिततेसाठी काही सोप्या खबरदारीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्विचबोर्ड नेहमी मुलांपासून दूर ठेवा आणि त्यावर योग्य झाकण वापरा. जुनी किंवा खराब वायरिंग असल्यास त्वरित बदल करणे गरजेचे आहे. फ्युज योग्य प्रकारे वापरा आणि ओव्हरलोड होऊ देऊ नका; फ्युजची क्षमता उपकरणाशी जुळणारी ठेवा.
