जळगाव : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ५ टक्के सेस फंडातून ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवून त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
या योजनेंतर्गत शिवणकाम, मोबाइल रिपेअरिंग, ब्युटी पार्लर, बेकरी, शेळीपालन आणि कृषी आधारित व्यवसाय यासारख्या क्षेत्रांना योजनेत प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
२४ पर्यंत करता येणार अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत आपला अर्ज दाखल करता येणार आहे. पात्र दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभघ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
योजनेसाठी पात्रता काय ?
१. अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा.
२. किमान ४० टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे.
३. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
कसा करता येणार अर्ज..?
अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज, यूडीआय कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा / ८ अ / भाडे करारनामा, आधार कार्ड, २ फोटो, प्रशिक्षण प्रमाणपत्र, बैंक खाते क्रमांक (राष्ट्रीयीकृत / शासकीय बँकेचा), शिक्षण प्रमाणपत्रे आणि प्रकल्प अहवाल, या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पंचायत समितीकडे सादर करायचा आहे. निवड झालेल्या लाभार्थीना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान वितरित केले.
