राहुल पेटकर
आदिवासी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा (MSP) लाभ मिळावा, यासाठी आदिवासी विकास महामंडळामार्फत नागपूर जिल्ह्यात धान खरेदी(Dhan Kharedi) सुरू करण्यात आली आहे. (Dhan Kharedi)
मात्र, संपूर्ण जिल्ह्यासाठी केवळ रामटेक तालुक्यातील पवनी आणि डोंगरी ही दोनच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.(Dhan Kharedi)
या दोन केंद्रांवर २७ नोव्हेंबर २०२५ पासून १ जानेवारी २०२६ पर्यंत १८२ शेतकऱ्यांकडील एकूण ८ हजार ८०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.(Dhan Kharedi)
यावर्षी रामटेक तालुक्यातील पवनी व डोंगरी या दोन केंद्रांवर धान खरेदीसाठी एकूण २ हजार १७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये ७८ आदिवासी व १०४ बिगर आदिवासी शेतकऱ्यांचा समावेश आहे. (Dhan Kharedi)
पवनी केंद्रावर १,०७० तर डोंगरी केंद्रावर १,१०१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरूच आहे.(Dhan Kharedi)
बीम ॲपमुळे चुकारे रखडले
मागील वर्षापर्यंत धान खरेदीसाठी 'एनईएमएल' पोर्टलचा वापर करण्यात येत होता. यंदा मात्र राज्य सरकारने बीईएएम (BEAM) ॲप लागू केले आहे. या अॅपवर शेतकऱ्यांचा डेटा नव्याने भरावा लागत असून, अॅप अत्यंत संथ गतीने कार्य करत आहे.
लॉट पद्धतीने डेटा भरण्यात येत असताना अनेक वेळा नावे वगळली जात असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. बीम ॲपच्या सर्व्हर समस्येमुळे आठ शेतकऱ्यांच्या लॉटची एन्ट्री होऊ न शकल्याने ३६५.६० क्विंटल धानाची ऑफलाइन खरेदी करावी लागली.
उघड्यावर धान साठवणुकीची चिंता
डोंगरी येथील खरेदी केंद्रावर साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने खरेदी केंद्र सध्या बंद आहे. या ठिकाणी गोदामात ७,२८९.६० क्विंटल तर उघड्यावर १,५१३.६० क्विंटल धान ठेवण्यात आले आहे.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता या धानाच्या सुरक्षिततेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
२.०८ कोटींचे चुकारे केव्हा?
आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात आलेल्या ८ हजार ८०३ क्विंटल धानाची खरेदी एमएसपी दराने म्हणजेच प्रतिक्विंटल २ हजार ३६९ रुपये दराने करण्यात आली आहे.
या खरेदीची एकूण रक्कम २ कोटी ८ लाख ५४ हजार ७८० रुपये इतकी असून, अद्यापही ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे 'धान विकले, पण चुकारे केव्हा?' असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
अधिकाऱ्यांचा खुलासा
शेतकऱ्यांची सर्व माहिती लॉट एन्ट्री करून शासनाकडे पाठविण्यात आली आहे. येत्या आठवड्यात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे चुकारे जमा केले जातील. तांत्रिक अडचणी असूनही दोन्ही केंद्रांवर नोंदणी व खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.- जी.एल. वरठी, उपप्रादेशिक व्यवस्थापक,आदिवासी विकास महामंडळ
शेतकऱ्यांची मागणी काय?
व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे चुकारे रखडू नयेत, अशी जोरदार मागणी होत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने चुकारे अदा करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
