देवानंद शेंडे
शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेले धान घरात पोहोचले असले तरी हमीभावाने खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून खरेदी केंद्र सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. (Dhan Kharedi)
पारशिवनी तालुक्यातून सुमारे १८ ते २० हजार क्विंटल धान बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(Dhan Kharedi)
अनेक शेतकरी धान घरात, अंगणात तसेच तात्पुरत्या शेडमध्ये साठवून ठेवत आहेत. यामुळे साठवणुकीचा खर्च, जागेची कमतरता आणि धान खराब होण्याचा धोका वाढला आहे. (Dhan Kharedi)
दरम्यान, हवामान खात्याने १८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उघड्यावर ठेवलेले धान भिजून खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
साठवणुकीमुळे वाढली अडचण
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पक्की गोदामे नसल्याने धान उघड्यावर किंवा तात्पुरत्या शेडमध्ये ठेवावे लागत आहे. यामुळे उंदीर, आर्द्रता आणि पावसाचा धोका वाढला आहे.
खरेदी उशिरा झाल्यास धानाचा दर्जा घसरून दर कमी मिळण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
व्यापाऱ्यांकडून कमी दराचा दबाव
खरेदी केंद्र सुरू नसल्याचा फायदा घेत काही व्यापारी कमी दरात धान खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हमीभाव न मिळाल्यास मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
राजकीय पातळीवरही मागणी
पारशिवनी तालुक्यात धानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून खरेदी केंद्र सुरू होण्यास होत असलेला विलंब हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन आमले यांनी केली आहे.
एकीकडे अवकाळी पावसाचा धोका आणि दुसरीकडे खरेदी प्रक्रियेतील विलंब यामुळे पारशिवनीतील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनाने त्वरित निर्णय घेऊन खरेदी केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
धान विक्रीसाठी तयार आहे; मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याने ते घरात साठवून ठेवावे लागत आहे. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.- शंकर चौधरी, शेतकरी
काही व्यापारी कमी दरात धान घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हमीभाव मिळाला नाही तर मोठे नुकसान होईल.- बाबुलाल धुर्वे (घाटपेंढरी)
अधिक वाचा : Harbhara Kharedi : हमीभावाने हरभरा विकायचा? मग 'या' अटी पूर्ण असणे बंधनकारक
