नाशिक : पुनंद खोऱ्यात मका पीक शेतकऱ्यांचे हुकमी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र परतीच्या पावसामुळे ते पूर्णतः वाया गेले असून, बळीराजा हतबल झाला आहे.
या परिस्थितीमुळे भविष्यात शेतकऱ्यांना सर्जा-राजाच्या चाऱ्याचा प्रश्न उद्भवणार आहे. तसेच दुभत्या जनावरांचे पोषण आणि दूध उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याने या व्यवसायातही मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर महिन्यात संततधार झालेल्या परतीच्या पावसामुळे पुनंद खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला असून पिकाला आलेल्या धानाची पूर्णतः नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय गुरांच्या वैरणीच्या टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जनावरांना खाण्यायोग्य राहिला नाही चारा
अवकाळी पावसामुळे पुनंद खोऱ्यात शेतकऱ्यांचे शेतातील मका पिकाची कणसे तर गेलीच, शिवाय हिखा व कोरडा चाराही पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे मक्याची पाने कुजली आणि सडली आहेत. जनावरांना चारा खाण्यायोग्य राहिला नसल्याने पशुखाद्याचा तुटवडा मोठा निर्माण होणार आहे.
दुर्गंधीमुळे जनावरे चाऱ्याला तोंडही लावेनात
कोरडा चारा बळीराजाकडून साठून ठेवण्यात येणारा कडपा (कोथळे) पावसात भिजून पेंड्या राहिल्याच नाही. असे शेतकरी सांगतात. थोडाफार झाकून ठेवलेला मक्याचे कोथळे (कडपा) चाराही सडून दुर्गंधी येत असल्याने जनावरे ते खात नाही. चाऱ्याची टंचाई असल्याने गुरांची आहार पद्धती बदलली आहे. त्यामुळे आजारपणाची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
