Crop Insurance Scam : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सोयाबीन कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे. (Crop Insurance Scam)
या गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांना विमा लाभ नाकारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा घोटाळा उघड झाला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crop Insurance Scam)
शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ नाकारण्यासाठी काही विमा प्रतिनिधी बेकायदेशीर मार्ग अवलंबत असल्याचा धक्कादायक प्रकार पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे उघडकीस आला आहे. (Crop Insurance Scam)
१४ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पीक कापणी प्रयोगावेळी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी बेकायदेशीर वजन काट्याचा वापर केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crop Insurance Scam)
प्रयोगावेळी उघडकीस आला घोटाळा
तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी खरब धानोरा येथे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचा कापणी व सुकवणी प्रयोग घेण्यात आला. हा प्रयोग ग्रामपंचायत अधिकारी अच्युत भालेराव यांच्या देखरेखीखाली पार पडला.
या प्रयोगावेळी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचे दोन प्रतिनिधी अनिकेत शेरे (रा. नालंदा नगर, नांदेड), रणदीप भालेराव (रा. पंचशील नगर, परभणी) हे दोघे उपस्थित होते.
वजनात मोठा फरक
प्रयोगानंतर गट क्रमांक ४४/२ मधील सोयाबीन धान्याचे वजन कंपनीच्या काट्याने घेण्यात आले असता ते ५ किलो आले. मात्र, गावातील सदस्य भास्कर कहऱ्हाळे यांनी वजनाबाबत शंका उपस्थित केली. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत दुसरा वजन काटा आणून पुन्हा वजन करण्यात आले असता ते ३ किलो इतके आढळले.
यामुळे कंपनीच्या काट्याने जाणीवपूर्वक अधिक वजन दाखवून उत्पादनाचे चुकीचे मापन करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले.
शेतकऱ्यांना विमा न मिळवून देण्याचा डाव
ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बेकायदेशीर प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी दाखवून त्यांना विमा मिळू नये यासाठी जाणूनबुजून प्रयत्न करण्यात आले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघड झाला.
या प्रकारामुळे तालुका कृषी विभाग आणि ग्रामस्तरीय विमा समितीने दोन्ही प्रतिनिधींविरुद्ध फसवणूक आणि शासकीय कार्यात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
प्रशासनाची कारवाई
या प्रकरणाची चौकशी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन करत आहे. पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्तक राहणे आवश्यक आहे.
प्रत्येक पीक कापणी प्रयोगात ग्रामस्थांची उपस्थिती बंधनकारक,
वजन काट्यांची पूर्वतपासणी आणि प्रमाणपत्र,
वादग्रस्त प्रकरणात व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्तीने करणे,
अशा उपाययोजना राबवण्याची मागणी स्थानिक शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे.
विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचा आहे. पण काही कंपनी प्रतिनिधींच्या बेकायदेशीर वागणुकीमुळे प्रामाणिक शेतकरीच नुकसानात जात आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे, असे स्थानिक शेतकरी सांगतात.
ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे 'मापात पाप' करणारा हा प्रकार उघडकीस आला आहे. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या या बेकायदेशीर प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाला धक्का बसला असून, आता प्रशासन या प्रकरणी कितपत कठोर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : Soybean Crop Loss : अतिवृष्टीचा कहर! सोयाबीन कापणी प्रयोग ठरला नुकसानीचा 'आरसा'