बापू सोळुंके
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. कारण शासनाच्या नव्या अटी आणि शर्ती. मागील वर्षी तब्बल ७६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला असताना, यंदा फक्त २७ टक्के शेतकरीच अर्ज भरत आहेत. (Crop Insurance)
पीक विम्यासाठी केवळ ४ दिवस शिल्लक असूनही, ७३ टक्के शेतकरी अद्याप विम्याच्या कवचाबाहेर आहेत. अटी कठीण, भरपाई निश्चित नाही आणि हप्ता स्वतः भरा या बदलांनी शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. (Crop Insurance)
पावसाच्या लहरीपणावर अवलंबून शेती करणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही एकमेव आर्थिक सुरक्षिततेची हमी असते. मात्र, यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अपेक्षित प्रतिसाद नोंदवला गेलेला नाही. योजनेसाठी अवघे ४ दिवस उरले असतानाही केवळ २७ टक्के शेतकऱ्यांनीच सहभाग नोंदवला आहे. (Crop Insurance)
गतवर्षीच्या तुलनेत सहभागात मोठी घसरण
२०२४ च्या खरीप हंगामात ७६ लाख ३१ हजार ५२७ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ४५ लाख २८ हजार ३२२ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांनी एकूण २८ लाख १९ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे विमा संरक्षण घेतले आहे. (Crop Insurance)
विम्याच्या अटींमध्ये बदल आणि परिणाम
शासनाने यंदा पीक विमा योजनेत काही महत्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांना आता स्वतःचा विमा हप्ता भरावा लागत असून, केवळ 'उंबरठा उत्पादन' गाठल्यासच भरपाई मिळेल.
याशिवाय नैसर्गिक आपत्तीमध्ये आधीप्रमाणे २५ टक्के आगाऊ भरपाईची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली आहे.
विभागनिहाय शेतकऱ्यांचा सहभाग
विभागाचे नाव | सहभाग (%) |
छत्रपती संभाजीनगर | ३४.४२ % |
कोकण विभाग | २३.६७ % |
नाशिक विभाग | २७.३७ % |
पुणे विभाग | १३.११ % |
कोल्हापूर विभाग | ८.७६ % |
लातूर विभाग | ४०.९६ % |
अमरावती विभाग | २२.०२ % |
नागपूर विभाग | ११.०१ % |
अद्यापही काही दिवस उरले आहेत. प्रचार प्रसिद्धी जोरात चालू आहे. शेतकऱ्यांचा कल शेवटच्या दिवसांतच विमाधारक होण्याकडे असतो. शासनाने केलेले बदल हे विचारपूर्वकच आहेत. आशा आहे की, जास्तीत जास्त शेतकरी पीक विमा योजनेत भाग घेतील.- जे. पी. शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक
हे ही वाचा सविस्तर : Crop Insurance : शेतात रेंज मिळेना, ई पीक पाहणीची अडचण, विमा काढायचा कसा?