Crop Damage : यंदा मान्सूनपूर्व तसेच मान्सूननंतरच्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः कोंडी केली. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. (Crop Damage)
तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदी पिके पाण्यात गेली. अनेक भागांत पिके पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकऱ्यांचा पेरणी खर्चही वसूल होऊ शकला नाही. (Crop Damage)
बुलढाणा जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे शेती क्षेत्राला भीषण फटका बसला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६ लाख ०८ हजार ९५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे ७ हजार ६२९ हेक्टर शेती जमीन खरडून गेली आहे. (Crop Damage)
या नैसर्गिक आपत्तीमुळे ७ लाख २७ हजार ७१४ शेतकरी बाधित झाले असून, जिल्ह्यातील शेती अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे.(Crop Damage)
५ लाख हेक्टरवर जिरायत पिकांचे नुकसान
जिल्ह्यातील ५ लाख ९५ हजार २०९ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत सर्वाधिक पावसामुळे सोयाबीन व कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पिकांची मुळे कुजली, तर काही भागांत पावसाच्या जोरदार प्रवाहाने शेती जमीनच वाहून गेली.
२१० गावे अतिवृष्टीने बाधित
अतिवृष्टी व अवेळी पावसाचा फटका जिल्ह्यातील २१० गावांना बसला. काही गावांमध्ये शेतजमीन अनेक दिवस पाण्याखाली राहिली, तर काही ठिकाणी शेतरस्ते, बंधारे, नाले आणि शेततळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेती कामांसोबतच गावांचा दळणवळण व्यवस्थेवरही परिणाम झाला.
महिनानिहाय बाधित क्षेत्र
एप्रिलमध्ये २,४३९ हेक्टर, जूनमध्ये ६,५९९ हेक्टर, जुलैमध्ये २१,०६१ हेक्टर, ऑगस्टमध्ये ३२,०३७ हेक्टर, सप्टेंबरमध्ये तब्बल १,१३,०९२ हेक्टर, ऑक्टोबरमध्ये ३,३५,९११ हेक्टर आणि नोव्हेंबरमध्ये ३५,४४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक धक्कादायक ठरले.
बागायत व फळपिकांनाही फटका
अतिवृष्टीचा फटका बागायत व फळपिकांनाही बसला असून, जिल्ह्यातील ३ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावरील बागायत व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३,२२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. एप्रिल व मे महिन्यातही पावसाचा परिणाम फळबागांवर दिसून आला.
सलग आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांसह शेती जमीन, संरचना व साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
