Join us

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना धक्का; जुन्या दरानेच नुकसानभरपाई वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 10:35 IST

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली. मात्र यंदा त्यांना जुन्या म्हणजेच कमी दरानेच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२४ चा जीआर रद्द झाल्यामुळे सुमारे ६०० कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या हाती येणार नाही. (Crop Damage Compensation)

विकास राऊत 

मराठवाड्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली. मात्र यंदा त्यांना जुन्या म्हणजेच कमी दरानेच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Crop Damage Compensation)

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी मुख्यमंत्री असताना ४५ हजार कोटींची भरपाई दिली होती, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ चा जीआर रद्द केला, तो पुन्हा लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार काय, या प्रश्नाचे उत्तर देणे खुबीने टाळले.(Crop Damage Compensation)

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना यंदा जुन्या म्हणजेच कमी दराने नुकसानभरपाई मिळणार हे स्पष्ट झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये तत्काळीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेला जीआर विद्यमान सरकारने जून २०२५ मध्ये रद्द केला आहे. त्यामुळे दुप्पट नुकसानभरपाईऐवजी शेतकऱ्यांना मार्च २०२३ च्या निकषानुसार भरपाई मिळेल.(Crop Damage Compensation)

पत्रकार परिषदेत शिंदेंची गोलमोल प्रतिक्रिया

सोमवारी छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात प्रश्न विचारला असता, "सरकार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही" एवढेच उत्तर त्यांनी दिले. मात्र, जानेवारी २०२४ चा निर्णय पुन्हा लागू करणार का, या प्रश्नावर त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.

मराठवाड्यातील नुकसानाचे चित्र

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पेरण्या हातून गेल्या आहेत. एकूण १२ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले असून, सुमारे १५ लाख ७८ हजार शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात आले आहे.

जिल्हाबाधित गावेप्रभावित शेतकरीपंचनामे झालेले टक्केवारीने
संभाजीनगर५५४,०६६६१%
जालना१८४२७,६५९१००%
परभणी३१९१,४३,१३५८२%
हिंगोली७०३१,७२,५७७७८%
नांदेड१,३२६६,५५,४१५७०%
बीड२०६४२,८९५७०%
लातूर७८२३,६४,५५१५९%
धाराशिव३६४१,६७,७३५४३%
एकूण३,९२९१५,७८,०३३४५%

नुकसानभरपाईतला फरक

२०२३ आणि २०२४ च्या निर्णयांमध्ये मोठा फरक आहे.

जाने. २०२४ निर्णय (शिंदे सरकार)

जिरायत – १३,६०० रु. प्रति हेक्टर (३ हे. मर्यादेत)

बागायत – २७,००० रु. प्रति हेक्टर (३ हे. मर्यादेत)

बहुवार्षिक पिके – ३६,००० रु. प्रति हेक्टर (३ हे. मर्यादेत)

मार्च २०२३ निर्णय (विद्यमान दर)

जिरायत – ८,५०० रु. प्रति हेक्टर (२ हे. मर्यादेत)

बागायत – १७,००० रु. प्रति हेक्टर (२ हे. मर्यादेत)

बहुवार्षिक पिके – २२,५०० रु. प्रति हेक्टर (२ हे. मर्यादेत)

त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण भरपाईत सुमारे ६०० कोटी रुपयांचा फरक पडणार आहे. २०२३ च्या दराने भरपाई दिल्यास आकडा १ हजार १०० रु. कोटींवर थांबेल, तर २०२४ च्या जीआरप्रमाणे ती रक्कम सुमारे १ हजार ७०० कोटींवर गेली असती.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

बियाणे, खते आणि शेतीमालाच्या किमती वाढलेल्या असताना जुन्या दराने मिळणारी भरपाई तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. पंचनामे झाले तरी प्रत्यक्षात हातात येणारी मदत ही खर्च भागविण्यासही अपुरी आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : GST Effect on Farmers : कृषी क्षेत्रावर जीएसटीचा थेट परिणाम; काय महत्त्वाचे, कुठे सूट? वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडाशेतकरीशेतीपाऊसहवामान अंदाजपीक