नाशिक : सध्या बंद पडलेल्या निफाड साखर कारखान्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मालमत्ता करांच्या थकबाकी वसुलीसाठी पिंपळस ग्रामपंचायतीने निसाकाला नोटीस पाठवत जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला.
पिंपळस रामाचे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याकडे ग्रामपंचायतीची ४ कोटी २३ लाख ४० हजार २७५ रुपये थकबाकी आहे. वेळोवेळी थकबाकी जमा करण्याबाबत ग्रामपालिकेने पत्र देऊही सदरची थकबाकी न भरल्याने आता पिंपळस रामाचे ग्रामपालिका निसाकावर मालमत्ता जप्तीची कारवाई करणार आहे.
ग्रामपंचायतीने अवसायक, निफाड सहकारी साखर कारखाना यांना २ ऑगस्ट २०२५ रोजी सात दिवसांच्या आत बिल भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच, ९ ऑगस्ट रोजी तीन दिवसांची नोटीस बजावण्यात आलेली होती. त्यानंतर या महिन्यात दि. १४ रोजी एक दिवसाची मालमत्ता जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस देण्यात आल्याची माहिती ग्रामपालिकेने दिली.
बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल व एनर्जी लिमिटेड निफाड सहकारी साखर कारखाना यांना देखील सात दिवसाची नोटीस बजावण्यात आली. दि. १४ ऑगस्ट रोजी मालमत्ता जप्तीच्या कार्यवाहीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
थकबाकी भरण्याची कार्यवाही केलेली नसल्याने येत्या सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी निफाड सहकारी साखर कारखाना येथे ग्रामपंचायत कायदा कलम १२९ (४) प्रमाणे कायदेशीर मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
निसाकाचे अवसायक आणि संबंधित कारखाना भाडेतत्त्वावर चालविणान्या आस्थापनेला आम्ही नोटिसा दिल्या आहेत. येत्या २५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत नियमानुसार मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
- निशा ताजणे, सरपंच
पिंपळस ग्रामपंचायतीची नोटीस दि. १६ रोजी प्राप्त झाली असून, याबाबत मी कारखान्याचे अवसायक व वरिष्ठांना कळवित आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
- एन. के. हांडोरे, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, निसाका.