- अनिरुद्ध पाटील
वसई : डहाणूतील चिखले गावचे शेतकरी चेतन अर्जुन उराड्या गेल्या दहा वर्षापासून देशी भाताच्या वाणांचे संकलन करत आहेत. त्यांनी गेल्या १० वर्षात ६० जाती एकत्रित केल्या आहेत.
आता ते त्यांचे उत्पादन स्वतः आणि इतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांनी केलेल्या संकलनाचे अनेकांकडून कौतुक होत असून लाल, काळ्या, हिरव्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या सुगंध असलेले बियाणे आणि तांदूळ लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत.
आदिवासी शेतकऱ्याकडून भाताचे देशी वाण संकलन
२००७ साली भाताच्या देशी वाण संवर्धनाचा संकल्प चिखलेतील आदिवासी शेतकरी चेतन यांनी केला. त्यांचे वडील अर्जुन शिडवा उराड्या हे एमएससी एग्रीकल्चर झाल्याने त्यांच्या ज्ञानाचा वारसा त्यांना लाभला. आदिवासी समाज दिवाळी सणात कुलदेवतेला लाल कुडई या स्थानिक जातीच्या तांदळाचा नैवेद्य अर्पण करतो, म्हणूनच जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांकडून देशी वाण संकलनाला त्यांनी प्रारंभ केला.
सोशल मीडियाद्वारे संपर्क करून मिळवल्या इतर जाती
पाचएकी, जवाऱ्या, कसबई, डांगी, काली कुडय, सुरती कोलम, मसुरा कोलम, जावयाची गुंडी, नवरा, जोंधळी जिरगा अशा जाती मिळाल्या. जव्हार येथे बायफ या संस्थेचीही मदत त्यांना झाली. सोशल मीडियाद्वारे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ या राज्यातून ग्रीन राईस, झिंक राईस, श्यामला, पंखुडी, काली कोयळी, कोथिंबीरा, रक्तशाली, विष्णुभोग, दुबेराज भात जाती तिथल्या शेतकऱ्यांकडून त्यांनी मिळवल्या.
ग्राहकांना विक्री करणार
देशी वाण, सेंद्रिय शेतीचे महत्व तसेच संकरीत बियाणे महाग असून रासायनिक खते व औषधांची आवश्यकता असल्याचे पटवून दिले जाते. त्यांच्याकडे भाताचा साठा असल्याने बियाणे, तांदूळ स्वरूपात ग्राहकांना विक्री करणार आहेत.
इतर शेतकऱ्यांना वाटप
विष्णूभोग, कसबई, मांजीरी, जोंधळी जिरगा, तुलसी व रेठरे बासमती, दुबेराज, झिंक राईस, मोतीचूर, कोथिंबीरा या सुवासिक तांदळाच्या जाती.
तर चकवा, कालाबाती, कालीकोयली, कृष्णम, केजिवली या काळ्या तांदळाच्या जाती आणि हिरवा तांदूळ सुद्धा त्यांच्याकडे आहे.
लाल कुडई, डांगी, नवारा, महाडी, श्यामला, रक्तशाली, लाजणी सुपर रेड, काली खडसी या लाल तांदळाच्या जाती आहेत. आज त्यांच्याकडे सुमारे ६० देशी भाताच्या जाती कणसरी या सीडबँकेत आहेत. त्यांची लागवड केल्याने बियाण्यांचे प्रमाण वाढले, अन्य शेतकऱ्यांना ते त्याचे वाटप करतात.
