Coffee farming in Melghat : मेळघाटातील चिखलदरा येथील कॉफीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, चिखलदऱ्याची कॉफी दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला आहे.
चिखलदरा येथील कॉफी उत्पादनाचे संवर्धन करत पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा निर्धार त्यांनी वैदर्भीय महिला मेळाव्यात व्यक्त केला.
चिखलदरा हेरिटेज कॉफी उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करून या कॉफीचे ब्रँडिंग व मार्केटिंग देशपातळीवर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
आगामी चिखलदरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे सविस्तर नियोजन करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
पर्यटन आणि रोजगाराला चालना
चिखलदरा हे विदर्भातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून येथे कॉफीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते.
या पार्श्वभूमीवर चिखलदरा पर्यटन केंद्र म्हणून अधिक विकसित व्हावे आणि स्थानिक आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कॉफी उत्पादनावर आधारित मूल्यवर्धित प्रकल्प उभारून स्थानिक महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
बचतगटांच्या स्टॉलला भेट
वैदर्भीय मेळाव्यातील बचतगटांच्या स्टॉलला भेट देताना बावनकुळे यांनी मेळघाटातील चिखलदरा येथील स्फूर्ती क्लस्टरच्या कॉफी उत्पादनाची माहिती घेतली.
या कॉफीमुळे मेळघाटची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कॉफीपासून तयार करण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
यावेळी मीनाक्षी व भारती भालेराव यांनी कॉफीपासून तयार करण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांची विशेष पेटी बावनकुळे यांना भेट देऊन आभार व्यक्त केले.
मूल्यवर्धन प्रकल्पाला चालना
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी चिखलदरा येथील कॉफी उत्पादनावर आधारित मूल्यवर्धन प्रकल्प उभारण्याबाबत पुढाकार घेतला आहे.
स्फूर्ती क्लस्टरच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी आशिष येरेकर (Ashish Yerekar) यांना देण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था, वर्धा (Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization) यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि स्टँडर्डायझेशनसंदर्भात अभ्यास केला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
चिखलदरा येथे कॉफी लागवडीचा पहिला प्रयोग इंग्रजांच्या काळात करण्यात आला होता.
विदर्भातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे कॉफीचे उत्पादन होते. त्यामुळे या कॉफीचे ब्रँडिंग आणि राष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग झाल्यास मेळघाट परिसराला आर्थिक बळ मिळण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
अधिक वाचा : Melghat Orange Palash : अविश्वसनीय नजारा! मेळघाटात पळसाच्या बहराने जंगल केशरी
