भंडारा : निसर्गाच्या लहरीपणामुळे उन्हाळी धान पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सिंचन सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी उत्साहात ५६,७७२ हेक्टरवर लागवड केली असली तरी, सध्या पीक निसवण्याच्या टप्प्यात ढगाळ हवामान, ऊन-पावसाच्या खेळाने आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाने उभे पीक पिवळे पडू लागले आहे. यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत.
हवामानातील बदलाने, रोगांचा उद्रेक
मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कडक ऊन व ढगाळ हवामानाचा खेळ सुरू आहे. यामुळे 'तुडतुडा' व 'करपा' रोगांचा प्रादुर्भाव वाढला. कमी कालावधीच्या वाणांवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे पीक निसवले असले तरी दूध भरण्याच्या अवस्थेत रोपे पिवळी झाली. हिरवे पीक अचानक पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांना डोळ्यांदेखत नुकसान होत आहे.
उत्पादन घसरणीची शक्यता वाढली
उन्हाळी धान शेती खरिपाच्या तुलनेत महाग असते; खत, कीटकनाशके व वीजबिलाचा बोजा शेतकऱ्यांवर पडतो. तरीही पीक पिवळे पडल्याने लोंब्यांत दाणे भरले जात नाहीत, ज्यामुळे धानाचे वजन कमी होते आणि खर्च वाढतो. अनेक ठिकाणी 'पोच' होण्याची भीती आहे. महाग फवारण्या केल्यानेही ढगाळ हवामुळे औषधांचा परिणाम होत नसल्याचे शेतकरी नमूद करतात. कृषी विभागाने तातडीने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी आहे.
खरेदी होणार की नाही?
केंद्र शासनाकडे आधीच तीन वर्षाचा बफर स्टॉक आहे. धान खरेदी केले तरी ते ठेवायचे कुठे असा मुख्य प्रश्न भेडसावत आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील धान अजूनपर्यंत पूर्णपणे विकल्या न गेल्याने रबी हंगामातून मिळणारे उत्पादन खरेदी केले जाणार काय? असा प्रश्नही निर्माण होत आहे. जिल्ह्यात एकंदरीत अजून २० लाख क्विंटल धान खरेदी करायचे बाकी आहे. तेवढी लिमीट शासन वाढवून देणार काय, असा सवाल आहे.
एखादा पुरुष, महिला जर मृत्युपत्र न करता मरण पावले तर मिळकत कुणाला मिळते? वाचा सविस्तर
