भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे.
मात्र एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर अतिगरम होऊन वारंवार बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता.
ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने मिरची पिकांना वेळेवर पाणी देता येत नव्हते. त्यामुळे पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली होती.
या गंभीर समस्येची दखल घेत आमदार संतोष दानवे यांनी तातडीने पुढाकार घेत विद्युत विभागाला सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलर आणि आवश्यक यंत्रणा बसविण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मर 'ओव्हरहीट'
पिंपळगाव रेणुकाई परिसरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरवरील ताण वाढला होता.
अतिगरम झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर वारंवार 'ओव्हरहीट' होत बंद पडत होते. परिणामी भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण होऊन शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित होत होता.
विशेषतः मिरची पिकाला नियमित आणि वेळेवर पाणी देणे अत्यावश्यक असते. मात्र वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
आमदार दानवे यांची तातडीची हस्तक्षेप
शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीनंतर आमदार संतोष दानवे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीने कूलिंग यंत्रणा बसवावी आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे ही प्राथमिकता असून उन्हाळ्यात अखंडित वीजपुरवठा मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
ट्रान्सफॉर्मरला 'कूलर' बसवल्याने काय फायदा?
विद्युत विभागाच्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मरला कूलर बसवल्यानंतर त्यातील ऑइलचे तापमान नियंत्रित राहणार आहे. त्यामुळे ओव्हरहिटिंगमुळे होणारे तांत्रिक बिघाड कमी होतील आणि वीजपुरवठा अधिक स्थिर राहण्यास मदत होईल.
कूलिंग यंत्रणा बसवल्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान मर्यादित राहील. त्यामुळे ओव्हरहिटिंगमुळे होणारे बिघाड टळतील आणि शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळेल. तसेच ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण कमी होऊन सरकारी यंत्रणेचे नुकसानही टळेल.- मयूर बुलगे, शाखा अभियंता
मिरची उत्पादकांमध्ये समाधान
या निर्णयामुळे पिंपळगाव रेणुकाई परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानात पिकांना वेळेवर पाणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. आता वीजपुरवठा सुरळीत राहिल्यास मिरची पिकांचे संभाव्य नुकसान टळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते, ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडत असल्याने सिंचनाचे नियोजन कोलमडत होते. मात्र आता ही समस्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : Kharif Season : सरकारचा मोठा प्लॅन! शेतकऱ्यांसाठी अधिकारी पोहोचणार थेट बांधावर
