Bhogi Bhaji : इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असलेली मकर संक्रांत उद्या बुधवारी साजरी होणार असून, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज भोगीचा सण साजरा केला जातो. (Bhogi Bhaji)
या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या विविध भाज्या खरेदी करण्यासाठी महिलांची विशेष लगबग दिसून येत आहे. (Bhogi Bhaji)
एरव्ही घरगुती वापरासाठी एक-दोन प्रकारच्या भाज्या खरेदी केल्या जातात; मात्र भोगीच्या दिवशी पाच ते सहा प्रकारच्या मिक्स भाज्या घेतल्या जात असल्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. (Bhogi Bhaji)
'जो न खाये भोगी वो सदा रोगी' अशी जुनी म्हण असून, भोगीची भाजी आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे, हे या म्हणीतून अधोरेखित होते. (Bhogi Bhaji)
बाजरीची भाकरी आणि तिळाची चव
भोगीची भाजी प्रामुख्याने तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. त्यामुळे भाजीपाल्यासोबतच बाजारात तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्यालाही चांगली मागणी आहे.
भोगीची भाजी म्हणजे नेमके काय?
भोगीच्या दिवशी जास्तीत जास्त भाज्यांचा आस्वाद घ्यावा, अशी परंपरा आहे. हिवाळ्याच्या या काळात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या तसेच रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या सर्व भाज्या एकत्र करून बनवली जाणारी भाजी म्हणजेच 'भोगीची भाजी' होय.
या भाजीमध्ये घेवडा, गाजर, वाटाणा, कोनफळ, रताळे, भेंडी, ढोबळी मिरची यांसह बोरं, पेरू, भुईमुगाच्या शेंगा, गव्हाच्या ओंब्या अशा अनेक घटकांचा समावेश केला जातो. सर्व भाज्या स्वतंत्रपणे खरेदी केल्या तर खर्च वाढतो. त्यामुळे मिक्स भोगीची भाजी २० रुपये पावशेर दराने विक्रीस ठेवली आहे.- सागर पुंड, भाजी विक्रेता
आरोग्याचा खजिना : भोगीची भाजी
भोगीची भाजी ही केवळ परंपरेचा भाग नसून ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. हिवाळ्यातील भाज्या आणि तीळ, शेंगदाण्यासारखे उष्ण पदार्थ यामुळे ही भाजी फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असते.
भोगीच्या भाजीचे प्रमुख आरोग्यदायी फायदे
पचनसंस्थेसाठी उत्तम : भाजीमध्ये असलेले भरपूर फायबर पचनक्रिया सुधारते. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात.
मधुमेह नियंत्रणात मदत : रताळे आणि कोनफळासारख्या घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी उपयुक्त ठरते.
हृदय व हाडांचे आरोग्य : मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन क मुळे हाडे मजबूत होतात तसेच हृदयविकारांचा धोका कमी होतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : व्हिटॅमिन अ, क आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, खोकला तसेच इतर आजारांपासून संरक्षण मिळते.
त्वचेसाठी फायदेशीर : व्हिटॅमिन अ आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी, तजेलदार आणि तेजस्वी राहण्यास मदत होते.
थंडीपासून संरक्षण : तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्यासारख्या उष्ण पदार्थांमुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि हिवाळ्यातील थंडीचा त्रास कमी होतो.
परंपरा आणि आरोग्य यांचा संगम
थोडक्यात सांगायचे तर, भोगीची भाजी ही चवदार, पौष्टिक आणि आरोग्यदायी असून, ती हिवाळ्यात शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा व पोषक तत्त्वे पुरवते.
परंपरेसोबतच आरोग्याची जपणूक करणारी ही भाजी आजही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मानाचे स्थान टिकवून आहे.
हे ही वाचा सविस्तर : Amla Market : हिवाळा सुरू, आवळा बाजारात दाखल; भाव किती आहेत? जाणून घ्या सविस्तर
