जळगाव : सरकारने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली होती. पण, दिवाळी झाली तरीही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. दुसरीकडे, अवकाळी पावसाने तीन दिवसांपासून पहूर आणि परिसराला जोरदार झोडपले आहे. त्यामुळे पांढरे सोने भिजले आहे, तसेच काढणीस असलेली केळी आता झाडांवर पिकत आहेत.
सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसाने कापूस, मका, ज्वारी यासह भाजीपाला भिजला आहे. त्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे. ही सर्व पिके मातीमोल झाले आहेत. हमीभावापेक्षा कमी भावाने कापूस आणि मका व्यापारी खरेदी करत आहेत. आता केळीच्या बागा काढणीस आल्या आहेत. पण, भाव न मिळाल्यामुळे व्यापारी प्रतिक्विंटल केळी ५०० ते १५० रुपयांपर्यंत कमी भावाने खरेदी करीत आहेत.
अनेक बागांमध्ये केळी झाडावरच पिकायला लागली आहेत. सततच्या पावसाचा फटका केळी बागांना बसल्याने केळीची पिके मातीमोल होण्याच्या स्थितीत आहेत. लागलेला उत्पादन खर्च केळी उत्पादकांसाठी फेडणे कठीण झाले आहे.
जामनेर तालुक्यातील २५ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत. उर्वरित याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १५ कोटी रुपये मदत वितरीत करण्यात येणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे.
- नानासाहेब आगळे, तहसीलदार, जामनेर
गेल्या दोन वर्षांत सतत घसरत गेले दर
दोन वर्षांपूर्वी केळी उत्पादकांना २२५० रुपये एवढा भाव मिळाला. त्यानंतर कमी जास्त प्रमाणात सतत भाव घसरत गेले. सध्या केळीला ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असून हे पैसे हाती घेताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. केळीचे भाव घसरल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.
असे घसरत गेले केळीचे दर
जून १६५० रुपये, जुलै १२७५ रुपये, ऑगस्ट ८७५ रुपये, सप्टेंबर, ६५० रुपये, ऑक्टोबर ५०० रुपये.
"निसर्गही शेतकऱ्यांवर कोपला आहे. सरकारकडे आशा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. शासकीय मदत अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. सरकारने याकडे लक्ष द्यावे."
- राजू रामदास पाटील, प्रगतशील शेतकरी, नेरी बु., ता. जामनेर
