Banana Crop Damage : वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरातील शेतकरी आजही शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. (Banana Crop Damage)
कारण जून महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे महिला तलाठ्याने वेळेत दाखल न केल्याची गंभीर तक्रार आहे. (Banana Crop Damage)
या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, सरपंच राजेश इंगोले पाटील यांनी तलाठ्याविरुद्ध कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.(Banana Crop Damage)
वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त केळी पीक
जून महिन्यातील अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वसमत तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.
या नुकसानीनंतर आमदार राजू नवघरे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत तातडीने पंचनाम्यांचे आदेश दिले होते. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देशही महसूल विभागाला दिले होते.
इतर भागात मदत, कुरुंदा मात्र वंचित
तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पंचनामे पूर्ण करून वेळेत दाखल करण्यात आले. परिणामी, त्या भागातील शेतकऱ्यांना केळी नुकसानीचे अनुदान मिळाले आहे. मात्र, कुरुंदा येथील महिला तलाठ्याने आपले पंचनामे अद्याप महसूल विभागाकडे सादर केले नाहीत. त्यामुळे या गावातील शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.
चार महिने उलटले तरी अहवाल प्रलंबित
पंचनामे पूर्ण होऊन चार महिने उलटले असतानाही अहवाल महसूल प्रशासनाकडे दाखल न झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. काही शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे तोंडी तक्रार दाखल केली आहे.आता या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलन
तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी पंचनामे पूर्ण केले असतानाही तलाठ्याच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रशासनाने या कामचुकार तलाठ्यावर तातडीने कारवाई करावी. अन्यथा ग्रामपंचायत व शेतकरी संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल.- राजेश इंगोले पाटील, सरपंच
जून महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे आणि उर्वरितांना लवकरच मिळेल.- सुनील भिसे, तालुका कृषी अधिकारी
