भंडारा : सध्या खतांच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी ११०० रुपयांना मिळणारी खतांची गोणी आता थेट २००० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे शेती करणे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असून, सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अनुदान वाढवा, नाहीतर शेती पडीक
सरकारने तातडीने अनुदान वाढवले नाही तर शेती पडीक ठेवण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा खमारी येथील शेतकऱ्यांनी दिला. मजुरी, बियाणे व खतांच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.
खतांचे वाढलेले दर (रुपयांमध्ये)
- २०:२०:०:१३ - १८०० रुपये
- १०:२६:२६ - २२५० रुपये
- २४:२४:०० - २२०० रुपये
- १९:१९:१९ - २३०० रुपये
- पोटॅश - १९७५ रुपये
कृषी केंद्र चालकही आले तणावात
फक्त शेतकरीच नाही, तर लहान कृषी सेवा केंद्र चालकही अडचणीत सापडले आहेत. दर गगनाला भिडल्याने विक्री कमी होण्याची भीती असून, व्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याचे खमारी (बुट्टी) येथील शारदा कृषी केंद्राचे मालक प्रशांत समरीत यांनी सांगितले.
प्रतिबॅग ४०० ते ५०० रुपयांची झेप
मार्चनंतर खत कंपन्या आणि शासकीय यंत्रणांच्या निर्णयामुळे प्रतिबॅग ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी १००० ते ११०० रुपयांत मिळणारी बॅग आता १८०० ते २००० रुपयांपर्यंत पोहोचली असून, यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
निषेधाची ठिणगी पेटली
दरवाढीमुळे खमारी व परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून, सरकारविरोधात निषेधाची ठिणगी पेटली आहे. दर नियंत्रणात आणून अनुदान वाढविण्याची मागणी आहे.
रॉकेल वाटपाचा कोटा ठरला, दर ठरले, लवकरच वाटप , वाचा कधीपर्यंत वाटप सुरु होईल?
