जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून वादळी पावसाने (Avkali Paus) थैमान घातले असून, या पावसात जिल्हाभरातील दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष करून यामध्ये केळीचे मोठ्या प्रमाणात (Banana Crop damage) नुकसान झाले आहे.
याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी पंचनाम्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांप्रमाणे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे (Krushi Vibhag) तक्रारी केल्या आहेत. केळीसह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कृषी विभागाला पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश दिले होते.
तसेच याप्रकरणी कृषी सेवकांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पंचनामे करताना कृषी विभागाला किंवा कोणत्याही व्यक्तीला एकही रुपया देण्याची गरज नसते, मात्र विमा कंपनीचा धाक दाखवून काहीजण परस्पर शेतकऱ्यांकडून पैसे घेत आहेत.
अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही, अशी भीती दाखविली जात आहे. त्याच भीतीतून शेतकरी पंचनाम्यांसाठी ३ हजार ते ३५०० रुपये नाईलाजास्तव देत आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून, याप्रकरणी कृषी विभागाने शेतकऱ्यांनी कोणतीही रक्कम देऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच याबाबतची तक्रार थेट पोलिसांकडे करण्याचेही आवाहन केले आहे.
पंचनामे करण्यासाठी कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही. काही जणांकडून यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याची काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त इाल्या आहेत. शेतकऱ्यांनी अशा पैसे मागणाऱ्यांची तक्रार करावी.
- कुर्बान तडवी, जिल्हा कृषी अधीक्षक
World Bee Day : कीटकनाशकांच्या अतिरेकामुळे मधमाशी बांधापासून दुरावली, हे खरंय का?