नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना विक्रीला स्थगिती द्यावी, यासाठी अनेक दिवसांपासून हे प्रकरण कोर्टात होते. अखेर त्यावर दिल्ली प्राधिकरण / डी.आर. टी. न्यायालयाने विक्री प्रक्रिया रद्द केल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे यांनी दिली.
अॅड. विलास देशमाने यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या निर्णयामुळे विक्रीसाठीची पुढील कार्यवाही राज्य सहकारी बँकेला करावी लागणार आहे. योग्य पर्याय स्वीकारावा अशी विनंती बँक प्रशासनास करणार असल्याचे सुनील देवरे यांनी स्पष्ट केले आहे. विक्री प्रक्रियेस स्थगिती देत प्रक्रिया रद्द झाल्याने कार्यक्षेत्रात वसाकाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना विक्रीला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने कारखाना मालमत्ता विक्री प्रक्रियेस स्थगिती द्यावी व अन्य पर्याय स्वीकारण्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिका राष्ट्रीय कर्ज वसुली प्राधिकरण (डी आर टी न्यायालय) दिल्ली यांच्याकडे दाखल केली होती.
वर्षभरापासून विक्रीची प्रक्रिया....
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या (वसाका) विक्री प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी स्थानिक नेते, बचाव समिती, कामगार आणि शेतकरी यांच्याकडून जोरदार विरोध होत असून, त्यांनी लाक्षणिक उपोषणे केली आहेत. ही प्रक्रिया थांबवून कारखाना सहकार तत्त्वावर किंवा भाडेतत्त्वावर चालवण्याची मागणी होत आहे, कारण कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या (NCDC) आदेशानुसार ऑगस्ट २०२५ मध्ये त्याचा लिलाव होणार होता, यास विरोधकांनी विरोध करत तो थांबवला होता.
