जालना : अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ पी.एम. मिन्नू यांनी पाच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. (Anudan Ghotala)
या निर्णयामुळे ग्रामसेवक संघटनेत मोठी खळबळ उडाली असून, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने ही कारवाई अन्यायकारक असल्याची तक्रार केली आहे. (Anudan Ghotala)
प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
अंबड तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात या प्रकरणात सहायक महसूल अधिकारी सुशीलकुमार दिनकर जाधव, तलाठी शिवाजी श्रीधर ढालके, कोतवाल मनोज शेषराव उघडे, खासगी सहायक साहेबराव उत्तमराव तुपे यांना अटक करण्यात आली आहे.
सुशीलकुमार जाधव सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर इतर तिघांना पोलिस कोठडी मिळालेली आहे.
अन्य आरोपींवर तपास अद्याप सुरू असून, लवकरच त्यांच्याही विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.
निलंबनाची कारणे आणि कारवाई
या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा मीना यांनी एस.जे. चांदणे, एन.डी. बरीदे, एस.पी. देवगुंडे, डी.बी. नरळे, एम.टी. रूपनर यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
सीईओंनी कारवाईचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन आक्रमक झाली असून, त्यांनी या निर्णयाविरुद्ध निवेदन दिले आहे. संघटनेचे मत आहे की, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई अन्यायकारक आहे. सखोल चौकशी केल्यानंतर त्यांचा सहभाग सिद्ध होत नाही, त्यामुळे निलंबन रद्द केले जावे.
संघटनेची प्रतिक्रिया
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपांची पडताळणी केली पाहिजे. निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द व्हावे. - डी. बी. काळे, जिल्हाध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी युनियन
आर्थिक गुन्हे शाखेकडून काही महत्वाचे कागदपत्रे जप्त केली असून, त्याची तपासणी सुरू आहे. इतर आरोपींविरोधातही लवकरच अटक केली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
निलंबन झालेल्या अधिकारी कोण?
एस.जे. चांदणे, एन.डी. बरीदे, एस.पी. देवगुंडे, डी.बी. नरळे, एम.टी. रूपनर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.