बालाजी आडसूळ
भल्या पहाटे मोबाईलवर आलेल्या एका ई-मेलमुळे शेतकऱ्याची संपूर्ण शेती पद्धत बदलू लागली आहे. 'तुमच्या उसाच्या शेतातील मातीतील ओलावा इतका आहे. पिकाला आज ६२ हजार लिटर पाण्याची गरज आहे. (AI Sugarcane Farming)
ठिबक सिंचन ५८ मिनिटे सुरू ठेवा.' असा नेमका, शास्त्रीय आणि अचूक सल्ला देणारी ही यंत्रणा म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता(AI).अवर्षणप्रवण धाराशिव जिल्ह्यातून उस शेतीतील ही नवक्रांती उभी राहत आहे.(AI Sugarcane Farming)
नॅचरल शुगरचा पुढाकार, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास
कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा साखर कारखाना केवळ उत्पादनापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
चेअरमन तथा कृषिरत्न वि. बी. ठोंबरे यांनी उस उत्पादनवाढीसाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
या उपक्रमांतर्गत कळंब, अंबाजोगाई, केज आणि लातूर तालुक्यांत २६ अत्याधुनिक AI हवामान केंद्रे (हब) उभारण्यात आली आहेत.
हब–स्पोक मॉडेल : शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा
प्रत्येक AI हवामान केंद्राच्या २.५ किमी परिघात २० ते २५ ‘स्पोक सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.
या स्पोक सेंटरमध्ये बसविण्यात आलेली संयंत्रे सतत खालील बाबींची नोंद घेतात
मातीतील ओलावा (Soil Moisture)
मातीचे तापमान
हवामान बदल
वाऱ्याची दिशा व वेग
पावसाचा अंदाज
किड–रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव
या सर्व डेटावर प्रक्रिया करून AI शेतकऱ्यांना दररोज सकाळी ई-मेलद्वारे मार्गदर्शन करते.
७५३ शेतकरी AI शी जोडले
या प्रकल्पात आतापर्यंत ७५३ उस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडून नाममात्र शुल्क घेण्यात आले असून उर्वरित आर्थिक भार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, बारामती, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, नॅचरल शुगर यांनी उचलला आहे.
पोपट शितोळे : एआयवर विश्वास ठेवणारा शेतकरी
अंबाजोगाई तालुक्यातील तट बोरगाव येथील शेतकरी पोपट शितोळे यांच्या १२ एकर उसाच्या शेतात हे AI हवामान केंद्र कार्यान्वित आहे.
त्यापैकी ४ एकर खोडवा तर ८ एकर नवीन ऊस आहे. व्हीएसआय व पडेगाव येथील सुधारित बेणे त्यांनी वापरले आहे.
शितोळे सांगतात, पूर्वी अंदाजावर पाणी द्यायचो. आता AI सांगते— किती पाणी, किती वेळ. पाणी वाचतंय, पीक जोमात आहे.”
५ जानेवारी रोजी सकाळी आलेल्या मेलमध्ये उसाला ६२ हजार लिटर पाणी आणि ५८ मिनिटे ठिबक सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.
उत्पादनवाढीचा नवा मूलमंत्र
AI तंत्रज्ञानामुळे अनावश्यक पाणी खर्च टळतो
खतांचा अचूक वापर होतो
किड–रोगांचे वेळीच नियंत्रण शक्य होते
उत्पादन खर्च कमी होतो
एकरी उतारा वाढण्याची शक्यता निर्माण होते
अवर्षणप्रवण भागातून डिजिटल शेतीचा नवा आदर्श
धाराशिवसारख्या कोरडवाहू जिल्ह्यातून उभी राहिलेली ही AI आधारित उस शेती व्यवस्था महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांसाठी नवीन दिशा दाखवणारी यशकथा ठरत आहे.
