गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विदेश अभ्यास दौरा योजना राबवली जाते. या माध्यमातून जिल्हानिहाय शेतकऱ्यांची निवड करून अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जाते. मात्र आता या दौऱ्यासाठी राजकीय नेत्यांची निवड होऊ लागल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रा फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात असा प्रकार समोर आला आहे. विदेश अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागाने केलेल्या शेतकऱ्यांच्या निवडी वादात सापडल्या आहेत. पाचपैकी दोघे जण राजकीय पक्षांचे पदाधिकारी असून, एक व्यक्ती केंद्र सरकारच्या वतीने नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कारप्राप्त आहेत.
त्यामुळे ही निवड शेतीच्या अभ्यासासाठी की, शासनाच्या पैशांतून विशिष्ट व्यक्तींना परदेश सहल घडवित त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेकडून आक्षेप नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातही निवेदन सादर केले आहे.
अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
युरोप, इस्राइल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाइन्स अशा देशांमध्ये कृषीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांना पाठविण्यात येते. मात्र, शेतकरी भासवून राजकीय पदाधिकारी, संस्थाचालकांना पाठविण्याचा घाट घातल्याचा आरोप निवेदनात केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व निवड रद्द करून हिरळकर यांचे निलंबन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात तक्रार आली असेल तर माहिती घेतो, याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना विचारून चौकशी केली जाईल.
- अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली
