Join us

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेचा नवा श्वास वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 10:52 IST

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा (Zilla Parishad) मोठा निर्णय घेतला. जाणून घ्या सविस्तर

विजय सरवदे

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) मोठा निर्णय घेतला. बियाणे, खते आणि आता कीटकनाशकांचाही मोफत पुरवठा करून या कुटुंबांना पुन्हा शेतीत उभे करण्याचा प्रयत्न करण्यात पुढाकार घेतला आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार देण्यासाठी जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) बियाणे, खते आणि कीटकनाशके सुद्धा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी उपकरातील १० लाखांचा खर्च केला जाणार आहे.

आर्थिक ताणतणाव, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे केला आहे. 

या कुटुंबांचे जीवन पुन्हा सावरावे, यासाठी केवळ बियाणे आणि खतेच नव्हे, तर आता कीटकनाशकांचाही मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या निर्णयामुळे पीडित कुटुंबांना पुन्हा शेतीशी नातं जोडता येईल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शेतीच्या सुरुवातीसाठी आधार मिळेल, हा या योजनेचा दृष्टीकोन आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे मागील दोन वर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना मदत करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्या वर्षी सुमारे २०० कुटुंबाना बियाणे दिले. दुसऱ्या वर्षी २०२४-२५ मध्ये ११० लाभार्थ्यांना बियाणे आणि खतांचे वाटप केले. यंदा १० लाखांतून पीडित कुटुंबांना बियाणे, खते आणि कीटकनाशकेही दिली जाणार आहेत. 

जि. प. कृषी विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळवली आहे.

'डीबीटी' तत्त्वानुसार राबविणार योजना

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनी अगोदर बियाणे, खते व कीटकनाशकांची खरेदी करावी. त्याची पावती सादर केल्यानंतर लगेच कृषी विभाग संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. 

सध्या कृषी विस्तार अधिकारी निवड झालेल्या लाभार्थी कुटुंबांची भेट घेऊन कोणते पीक घेणार, किती हेक्टरवर पेरणी करणार, यासंबंधीची विचारपूस करत असून त्यांना या योजनेची माहिती दिली जात आहे.

१० लाख रुपयांचा खर्च या मोहिमेसाठी उपकारातून केला जाणार आहे. कोरडी सहानुभूती व भाषणबाजी ऐवजी ही थेट मदत असणार आहे.

योजनेची प्रक्रिया सुरू

पावसाने ओढ धरली असली तरी अनेक तालुक्यांत शेतकरी पेरणी करीत आहेत. पिकांचा कल घेऊन ही योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डीबीटी तत्त्वावर ही योजना राबविली जात आहे. यंदा कीटकनाशकेही दिली जाणार आहेत. - प्रकाश पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

हे ही वाचा सविस्तर : Halad Market Update : हळद बाजार थंडावला; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीजिल्हा परिषदकृषी योजनाऔरंगाबादखते