गडचिरोली : आरमोरी तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय (Farming) केला जातो. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करीत असतात. दरम्यान, शेतकऱ्यांना शेती सिंचन सोयीसाठी कृषीपंपाची (Krushi Pump) आवश्यकता असते; मात्र शासनाकडून ५ ते १० टक्के सबसिडी मिळत असली तरी अनेकजण आपल्या शेतामध्ये सौर कृषीपंप घेण्यासाठी नकार देत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी नदी, नाले, विहीर किंवा बोअरच्या साह्याने पाण्याची सोय शेतीला करीत असतात अशावेळी शेतकऱ्यांना विजेची (Power Supply) आवश्यकता भासत असते; पण वीज वितरण कंपनी मात्र वीज कनेक्शन देण्याऐवजी सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना देत आहे; परंतु शेतकरी सौर ऊर्जा पंप घेण्यास पूर्णपणे नकार देत आहेत. सौर कृषिपंप नको, वीज कनेक्शन द्या, अशी मागणी या भागातील अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
कृषी पंपासाठी वीज कनेक्शनची मागणी
इलेक्ट्रिक पंपाव्दारे पाणी शेतीला मुबलकपणे पाणी देऊ शकतो, तसे सौर ऊर्जा पंपाचे पाणी मुबलकपणे देऊ शकत नाही, त्यामुळे ही एक समस्या शेतकऱ्यांसमोर उद्भवत असते. शेतकऱ्यांचा सौर ऊर्जा पंपाला नकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
का नको सौर कृषी पंप ?
जिल्ह्याला लागूनच मोठी नदी वैनगंगा आहे व तिला जोडूनच अनेक उपनद्या आहेत, वैनगंगा नदीला गोसीखुर्द सारखे एक मोठे धरण आहे. तर उपनद्यांना इंडियाडोह सारखे प्रकल्प आहेत. त्यामुळे पावसात अतिवृष्टीने धरणाचे पाणी सोडत असतात. अशावेळी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर धानाची शेती पाण्याखाली जात असते. तेव्हा सौर ऊर्जा पंप सुद्धा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडत असतात.
एखादा सौर पंप पाण्याखाली बुडला की तो पाण्यामुळे निकामी होतो, तो पंप दुरुस्ती होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेक शेतकरी सौर पंप घेण्यास धजावत नाहीत. ४ इलेक्ट्रिक पंप असला तर पूर परिस्थितीत पंप पाण्याखाली गेला तरी ऑटोमॅटिक लाईन ट्रिप होऊन फ्यूज जात असते, त्यामुळे इलेक्ट्रिक पंप शेतकऱ्यांना सोयीस्कर व सुरक्षित वाटतो.