Well Recharge : विहीर पुनर्भरण म्हणजे विहिरीतील पाण्याची पातळी (Ground Water Level) वाढवणे, यामुळे पाणीटंचाईवर मात करता येते. विहीर पुनर्भरण करण्यासाठी खड्डे खणून त्यात दगड, खडी, वाळू आणि कोळसा यांचे थर भरेले जातात. ही विहीर पुनर्भरणाची पध्दत नेमकी कशी वापरली जाते? ते सविस्तर पाहुयात....
विहीर पुनर्भरणाची पध्दत
- विहीर ओढ्याच्या अंतरामध्ये तीन मीटर व दोन मीटर लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत.
- पहिला खड्डा तीन मीटर लांब, तीन मिटर रुंद व एक मिटर खोल घ्यावा.
- दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून तीन मिटर अंतरावर घ्यावा.
- दुसरा खड्डा दोन मीटर लांब, १.५ मीटर रुंद व दोन मीटर खोल घ्यावा.
- पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा पी.व्ही.सी. सहा इंची पाइपव्दारे दुसऱ्या खड्ड्यास जोडावा.
- पहिला खड्डा दगड-गोट्यांनी भरावा..
- दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी ०.४५ मीटर जाडीचा खडीचा थर भरावा.
- त्या थरावर ०.४५ मीटर जाडीचा वाळूचा थर भरावा.
- त्यानंतर ०.४५ मीटर जाडीचा बारीक वाळूचा भरुन त्यावर ०.१५ मीटर जाडीचा विटांचा चुऱ्याचा थर भरुन घ्यावा.
- हा खड्डा तळापासून चार इंची पी.व्ही.सी. पाईपव्दारे विहिरीशी जोडवा.
- ओढ्यातील पाण्यामधील पालापाचोळा, कचरा इत्यादी तीन मीटर लांब, तीन मिटर रुंद व एक मीटर खोल खड्ड्यात स्थिरावतील आणि कण विरहित पाणी पाईपव्दारे दोन मिटर लांब, १.५ मीटर रुंद व दोन मीटर खोल खड्ड्यात जाईल.
- दुसऱ्या खडड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाईपव्दारे जाउन विहीर पुनर्भरण होईल.
- वरीलप्रमाणे विहीर पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः १७ हजार ५०० रुपये एवढा खर्च येतो.
- - कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव, नाशिक