Pune : "मागच्या महिन्यात राज्यात अतिवृष्टीचे संकट आलं आणि शेतकरी अडचणीत आला. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. पण ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांनी या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी मार्गदर्शन करावं. शेती आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना जो काय लाभ घेता येईल त्यासाठी तुमच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे असे मार्गदर्शन करा." असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या ॲग्रिकॉस या दिवाळी अंकाचे प्रकाशन कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कृषी महाविद्यालय पुणे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ॲग्रिकॉस या दिवाळी अंकाचे संपादक शेखर गायकवाड यांनी यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी काही मागण्या केल्या. पुणे कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली. यासोबतच कृषी विभाग किंवा प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये संबंध आणि संवाद वाढायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले.
कृषी समृद्धी योजना ही खूप चांगली योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आपण शेतकऱ्याचे उत्पादन वाढण्यापेक्षा उत्पन्न वाढीकडे लक्ष दिले पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित दर मिळत नसल्यामुळे प्रक्रिया उद्योगांकडेही लक्ष दिले पाहिजे. कृषी पदवीधर विद्यार्थ्यांकडे खूप प्रेरणा असते, प्रशासनाचे सर्वात जास्त हेच विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे ऊर्जा असते असेही कृषीमंत्री म्हणाले.
या 'स्पिरिट'च नाव ॲग्रीकॉस
"कृषी पदवीधरांमध्ये जे स्पिरिट आहे, ते कोणत्याच विद्यार्थ्यांमध्ये नसतं. या 'स्पिरिट'च नाव ॲग्रीकॉस आहे. या माजी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी आम्ही स्टेट महाराष्ट्र एग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी नावाने एक सोसायटी स्थापन केली आहे. महाविद्यालय पुण्याच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित करून आम्ही कृषिरत्न नावाने हा संग्रह प्रकाशित करणार आहोत." असं शेखर गायकवाड म्हणाले.