Agriculture News : एकीकडे कांद्यासह टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दोन्ही पिकांना कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. अशातच निफाडच्या पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एकीकडं भाव कमी दुसरीकडं शेतकऱ्याची अशी फसवणूक यामुळे इतर शेतकऱ्यांनी माल विक्री करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे टोमॅटो खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिघा एजंटांविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू सखाराम जोगदंडेकर हे टोमॅटो खरेदी करून पॅकिंग व ट्रान्स्पोर्टद्वारे बाहेर राज्यात पाठविण्याचा व्यवसाय करतात.
संशयित हे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो व्यापाराशी संबंधित एजंट असून, फिर्यादी व संशयित यांच्यात पूर्वीपासून खरेदी-विक्रीचा आर्थिक व्यवहार सुरू होता. जोगदंडेकर यांनी अंकुश गुप्ता, रा. नवी दिल्ली यांना दिल्ली येथे टोमॅटो पाठविण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६७६ कॅरेट तयार टोमॅटो खरेदी केले. त्यानंतर ते दिल्लीकडे पाठविले.
प्रवासादरम्यान राहुल बस्ते, राहुल, व अशोक ढोमशे यांनी संगनमत करून गाडी अडवली. शिरवाडे वणी येथे अडवून चालक जिहाउल अली यास सांगितले की, मालाचे पैसे बाकी आहेत, असा बहाणा करून जबरदस्तीने टोमॅटो गाडीतून उतरवले व ६७६ कॅरेट टोमॅटो गाडीमध्ये भरून ते फरार झाले.
तीनही संशयितांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकारात फिर्यादीचा दीड लाख रुपयांचा माल लंपास केला असून, या तीनही संशयिताविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश हेंबाडे करत करीत आहेत.
