नाशिक : सततच्या अस्मानी संकटांमुळे 'द्राक्षाची पंढरी' म्हणून (Grape Farm) ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि अनियमित हवामानामुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त होत असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
याच संकटाला कंटाळून निफाड तालुक्यातील (Lasalgoan) लासलगावजवळील कोटमगाव येथील शेतकरी अजित गांगुर्डे यांनी स्वतःच्या द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालवत ती भुईसपाट करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगला गांगुर्डे यांनी गट क्रमांक २३६ मध्ये दोन एकर क्षेत्रावर लाखो रुपये खर्च करत द्राक्षबाग लावली होती. परंतु, गेल्या तीन ते चार वर्षापासून सलग गारपीट, अवकाळी पावसाचे तडाखे आणि आता यंदा दिवाळीनंतरही सुरू असलेल्या पावसामुळे त्यांचे अतोनात नुकसानझाले. पाऊस अद्याप सुरू असल्याने ढगाळ वातावरण कायम आहे.
पंचनाम्यासाठी कुणी आले नाही
परिणामी, द्राक्षबागांना आवश्यक ते ऊन मिळाले नाही. यामुळे फळधारणा पूर्णपणे कोलमडली असून, झाडांची वाढ खुंटली आहे. द्राक्ष निर्यात, उत्पादन आणि बाजारभाव या तिन्ही पातळ्यांवर मार बसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. कृषी अधिकाऱ्यांना पंचनाम्यासाठी सांगूनही ते प्रत्यक्ष पाहणीसाठी आले नाहीत. अजित गांगुर्डे शेतकऱ्याने द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवत ती सपाट करण्यास सुरुवात केली आहे.
आर्थिक संकट कोसळले
द्राक्ष शेतीऐवजी लहान-मोठे पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष शेतीतील गुंतवणूक खर्च, प्रशासनाकडून मदतीचा अभाव यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे.
सततच्या अवकाळी पावसाने आमच्या द्राक्षबागेला उद्ध्वस्त केले. कर्ज फेडायचं कसं, घर चालवायचं कसं? प्रशासन पंचनामा करायला तयार नाही. मग आम्ही काय करायचं? शेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
- मंगला गांगुर्डे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कोटमगाव
