नाशिक : जागतिक कृषी महोत्सवाच्या (Jagtik krushi Mahotsav) दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे आठ विवाह पार पडले. तर ५०० हून अधिक उपवर मुला-मुलींनी विवाहासाठी नोंदणी केली. प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी व कृषि विभाग महाराष्ट्र शासन (Krushi Vibhag Maharashtra), प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने युथ फेस्टिवल मैदानावर जागतिक कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शेती विषयी अनास्था दूर व्हावी, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि सेंद्रिय शेतीचा लाभ सर्वांना मिळावा, अशा बहुविध उद्देशाने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कृषी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुला मुलींचा विवाह पार पडला. यात पंकज मुरमुरे-खुशी बावणे (शिर्डी), भूषण देवकर -वृषाली मवाळ (शिर्डी),आदित्य देशमुख -पल्लवी देवकर (अहिल्यानगर), सागर गावित -कल्याणी कोकणे (नंदुरबार ),धनंजय मैसाने -साक्षी गाडगे (अकोला), शुभम सारडा- सारिका बजाज (परभणी), रचित सहस्त्रबुद्धे- शुभांगी कारसर्पे (परभणी), प्रशांत अहिरे-दीपाली (नाशिक) या आठ उपवर मुला मुलींचा विवाह पार पडला. सर्व आठ नवपरिणीत दांपत्याला सेवामार्गातर्फे भांड्यांचा संच कन्यादान म्हणून भेट स्वरूपात देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या विवाह सोहळ्यात आबासाहेब मोरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच आजचा उपक्रम आयोजित केला आहे. सेवामार्गाचे सारे उपक्रम हे समाज, देश आणि धर्म तसेच विश्वशांतीसाठी आहेत असे प्रतिपादन केले. विवाह नोंदणीला शेतकऱ्यांच्या मुली मुलींचा चांगला प्रतिसाद मिळाला.