Mahadbt Portal : महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी कार्यरत असलेले महाडीबीटी पोर्टल काही दिवसांपासून बंद पडले आहे. शेतकऱ्यांची महाडीबीटीवरील अनेक कामे खोळंबली आहेत. नवीन अर्ज करणे, योजनेचे पेमेंट करणे, सद्यस्थिती तपासणे आदी कामे रखडल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पोर्टल आहे. शेतकरी कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी (उदा. कृषी यांत्रिकीकरण) ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करू शकतात आणि अनुदानाची प्रक्रिया येथूनच केली जाते. मात्र सध्या या पोर्टलचे सर्व्हर डाऊन असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी झटका मशीन, सोलर मशीन साठी अर्ज केले होते, मात्र पोर्टलचं बंद असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे.
महाडीबीटी पोर्टल सतत ठप्प
सद्यस्थितीत रानडुक्कर, बिबटे, हरिण यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी गंभीर धोका ठरतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर मशिन, झटका मशीनची गरज आहे. मात्र योजना ढेपाळली आहे. मागील काही दिवसांपासून महाडीबीटी पोर्टल ठप्प आहे. अर्ज भरताना त्रुटी, सबमिट न होणारे अर्ज, 'सर्व्हर डाउन' यामुळे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. नवीन अर्ज करता येत नाहीत, परिणामी योजना प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी पंगु ठरली आहे
एक वर्ष लोटलं, खरिपाचा हंगामही गेला. पण अनुदान अजून मिळाल नाही. पोर्टलची तांत्रिक अडचण प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावी. अनेक दिवसांपासून पोर्टल बंद आहे. दहा महिन्यांपासून पेमेंट पेंडिंग आहे. नवीन लाभार्थ्यांना अर्जही करता येत नाही. काही गावं अजूनही योजनेत नाहीत. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- गंगाधर निकुरे, शेतकरी
