नाशिक : रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतीवापरामुळे नापीक झालेली जमीन सुपीक करावयाची असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल. या शेतीसाठी जीवामृत हेच अमृत आहे, असे सांगत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
राज्यपाल आचार्य देवव्रत हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत नैसर्गिक शेतीचे महत्व सांगितले. यावेळी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी सुनील घडवजे यांच्या शेतावर जाऊन श्रमदान केले. त्यानंतर तेथेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्यपाल देवव्रत यांनी सांगितले, नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणे काळाची गरज आहे. या शेतीमुळेच जमीन सुपीक होण्यास मदत होईल. या शेतीचा गावागावात प्रचार आणि प्रसार करावा. याबरोबरच शेतकऱ्यांनी देशी गायींचे पालन करून त्यांचे संवर्धन करावे. त्यांचे पालन नैसर्गिक शेतीला पूरक ठरणारे आहे, असे सांगत त्यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना दाखविले.
प्रारंभी राज्यपाल देवव्रत, मंत्री झिरवाळ यांनी श्रमदान करीत चाऱ्याची कापणी केली. तो त्यांनी गाय आणि कालवडीला खाऊ घातला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून त्यांचेकडे असलेल्या गायींची माहिती घेतली. प्रत्येक शेतकऱ्यांने गो पालन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
