- राजेश बारसागडे
चंद्रपूर : अनेक शेतकरी धान शेतीव्यतिरिक्त (Paddy farming) इतर किमती पिकांचे उत्पादन घेण्यास पुढाकार घेतच नाहीत. अथवा हिंमत करून बघत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना उचित प्रगती साध्य करता येत नाही. मात्र, नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या एका प्रयोगशील शेतकऱ्यांनी अद्रकाचे (Ginger Farming) एक वेगळे पीक घेण्याचे धाडस दाखविले आणि लाखोचे उत्पादन मिळविले.
उद्धव धोंडूजी मांढरे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. नागभीड तालुक्यातील (Nagbhid Taluka) या शेतकऱ्याकडे सात एकर शेती आहे. वेगवेगळ्या पिकाचे प्रयोग ते शेतात करीत असतात. यापैकी केवळ पाव एकर शेतात त्यांनी अद्रकाची लागवड केली. हिरव्यागार पिकाची चांगली वाढ झाली. भरपूर कंद आली आणि या पाव एकरातून सुमारे दीड लाखाहून अधिक रुपयांचे उत्पादन घेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी आतापर्यंत त्यांना जवळपास ८० हजार रुपये एवढा खर्च आलेला आहे. त्यांनी जून महिन्यात अद्रकाच्या कंदांची लागवड केली.
हे पीक निघायला साधारणता आठ महिने एवढा कालावधी लागतो. मात्र, भाव बघून पीक काढणीचा कालावधी वाढविता येतो. जेवढा कालावधी वाढतो, तेवढे उत्पादन वाढते आणि अधिक नफा मिळविता येतो, असे त्यांनी सांगितले. या बाबीची माहिती कृषी विभागाला लागली आणि तालुक्याच्या कृषी चमूने त्यांच्या शेताला भेट दिली आणि अद्रक पिकाबद्दल जाणून घेऊन खूप समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचेच उत्पादन घेतले जाते. मात्र, धानाच्या शेतीतून फारसा नफा मिळत नाही, असं येथील शेतकरी सांगतात. ही बाब लक्षात आल्यानंतर उद्धव मांढरे यांनी अद्रकाची शेती करण्याचे ठरविले. ही शेती कशी केली जाते, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रथम अभ्यास दौरा केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याजवळील तांबेवाडी येथील अद्रक पिकविणाऱ्या शेतकऱ्यांकडून लागवडीचे तंत्र जाणून घेतले. त्यांच्याकडूनच अद्रकाचे "बेने" (कंद) विकत आणले व आपल्या शेतात पेरले.
अद्रक भरघोस उत्पादन देणारे पीक
धानाच्या शेतीत फारसा नफा राहिला नाही. धानाची शेती केवळ जीवन जगण्याचे साधन बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर नगदी पिकांकडे वळण्याची गरज आहे. यावर्षी प्रयोग म्हणून पाव एकरात अद्रकाची लागवड केली. पुढील वर्षी जास्त शेतात अद्रकाची लागवड करायची आहे, असा मनोदय मांढरे यांनी व्यक्त केला.