यवतमाळ : रब्बीतील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसभर लाइट (Power Supply Down) नसते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना गहू, हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी अख्खी रात्र जागून काढावी लागते. किर्रर्र अंधारात कडाक्याच्या थंडीत, वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागते. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे (Light Shutdown) त्रस्त आहे. रात्र-रात्र जागून रब्बीचे पीक जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.
किर्रर्र अंधारात, कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याला जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले. रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान लाइट येत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाइट लाइफ (Night Life) सुरू झाले आहे. अशातच जास्तीचा भार येत असल्यामुळे रोहित्रांचे फ्युज उडतात. ओल्या ठिकाणी जीव मुठीत धरून त्यांना फ्युज टाकावे लागतात.
अंधाऱ्या रात्री विंचू काट्यांची पर्वा न करता वाचविण्यासाठी बळीराजाला धडपड करावी लागत आहे. अशातच सगळीकडे वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली शेतकरी रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देत असतात. दिवसा वीज मिळत नसल्याने महावितरणच्या कारभाराविषयी शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकांची लागवड (Rabbi Season) करण्यात आली आहे. यामध्ये गहू, हरभरा, मका, ज्वारी, पिकांची लागवड असल्याने पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. विहिरीत पाणी असूनही कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. आमच्या परिसरात शेतशिवारातील वीज पुरवठा रात्रीच्यावेळी सुरू असतो. दिवसा मात्र तो बंद असतो. त्यामुळे जीव धोक्यात घालून आम्हाला रात्री पिकांना पाणी द्यावे लागते.
- सुभाष चिकटे, शेतकरी, टाकरखेडा
दिवसभर विजेचा लपंडाव
यंदा पावसाळा चांगला झाल्याने रब्बी हंगाम जोमात आहे. सध्या रब्बी पिकांना वाचण्यासाठी शेतकरी कष्ट घेत आहेत. मात्र, लाइटसाठी संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. विजेचा लपंडाव सुरू असल्याने बळीराजा हताश झाला आहे. वेळेवर पाणी देता यावे, यासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी आहे.